गटारावंर पाच हजार झाकणे, पाणी जाण्यासाठी ४२ कोटींचा नाला
वसई : पावसाळ्यात शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, पाण्याचा निचरा व्हावा तसेच उघडय़ा गटारात पडून दुर्घटना घडू नये, यासाठी वसई-विरार महापालिकेने यंदा विशेष योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत बंदीस्त गटारांवरील उघडय़ा चेंबरवर पाच हजार झाकणे, नालासोपारा पूर्वेला ४२ कोटींचा नाला बांधणे आदींचा समावेश आहे.
दरवर्षी पावसात वसई-विरार शहराच्या सखल भागात साचलेल्या पाण्याचा आठडाभर निचरा होत नव्हता. याशिवाय गटारांवर झाकणे नसल्याने दुर्घटना घडण्याची भीती असायची. हे सर्व टाळण्यासाठी यंदा पालिकेने नालेसफाईबरोबर विविध उपाययोजना केल्या आहे. त्याचा परिणामा पहिल्या पावसात दिसून आला. दरवर्षी ज्या भागात पाणी साचायचे तेथे पाणी साठले नाही, शिवाय ज्या ठिकाणी पाणी साचले होते तेथील साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. याबाबत माहिती देताना पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले की, पावसात शहर जलमय होण्याची समस्या दूर करण्यासाठी रेल्वे आणि खारभूमी विभागाचे साहाय्य घेतले.
पालिकेने रेल्वेला २४ कोटी रुपये दिले आणि तीन कल्वर्ट (उघाडय़ा) बांधून घेतले. त्यामुळे पश्चिमकडून पूर्वेकडे पाणी वाहून जाऊ शकले. याशिवाय चिखलडोंगरी आणि नारिंगी येथे खारभूमी विभागाकडून २ मोठय़ा उघाडय़ा बांधून घेतल्या. त्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च आला. मुसळधार पाऊस आणि भरती एकत्र आली की भरतीचे पाणी शहरात शिरून शहर जलमय होत होते. यासाठी पालिकेने १७ ठिकाणी उघाडय़ांना झडपा बसवल्या त्यामुळे भरतीचे पाणी शहरात येण्यास अटकाव झाला. शहरात एकूण २२५ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. या सर्व नाल्यांच्या सफाईचं काम पूर्ण झालं आहे.
नालासोपारा पूर्वेला वसंत नगरी, एव्हरशाईन सिटी या परिसरात पाणी साठून संपूर्ण भाग तसेच मुख्य रस्ता जलमय होत असतो. यासाठी नालासोपारा पूर्वेला फलाट क्रमांक ३ पासून देशमुख फार्मपर्यंत अडीच किलोमीटरचा नाला बांधण्यात येत आहे. या मोठय़ा नाल्यासाठी ४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या नाल्यासाठी खोदकाम केल्यामनुळे नालासोपारा पूर्वेकडील पाण्याचा निचरा होऊ लागला आहे, असे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले.
सर्व बंदिस्त गटारांची झाकणे बदलणार
वसई विरार शहरात मोठय़ा प्रमाणावर गटारांची झाकणे तुटलेली आहेत तर काही ठिकाणीची झाकणे ही गायब झालेली आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर नागरिक गटारांवरून चालत असतात. मात्र झाकणे उघडी असल्यास त्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता असते. यामुळे वसई विरार महापालिकेने संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी सरसकट शहरातील सर्वच गटारांवरील चेंबरवरील झाकणे बदलून नवीन झाकणे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेच्या अभियंत्यांनी ९ प्रभागातील सर्व बंदिस्त गटारांची पाहणी केली आणि एकूण किती झाकणे लागतील याचा अहवाल तयार केला. आयुक्त गंगाथरन डी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून चांगल्या दर्जाची झाकणे लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार ९ प्रभागात ४ एजन्सीमार्फत ही झाकणे लावण्याचे काम सुरू झालेले आहे. या कामासाठी एकूण अडीच कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
शहरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी यंदा विशेष उपाययोजना करत आहोत. रेल्वे आणि खारभूमीमार्फत उघाडय़ा बांधल्या आहेत. शहरात पूरपरिस्थिती येऊ नये यासाठी आणखी वेगवेगळ्या योजनांवर काम सुरू आहे
गंगाथरन डी., आयुक्त, वसई विरार महापालिका
संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी सर्व गटारांवर ५ हजार झाकणे बसविण्यात येत आहेत. भरतीच पाणी येऊ नये म्हणून उघाडय़ांवर १७ ठिकाणी झडपा लावण्यात आली आहेत तसेच नव्याने ४२ कोटी खर्चाचा नाला तयार करण्यात येत आहे
-राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई विरार महापालिका