वसई : वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाकडून ई बस सेवा सुरू केली आहे. मात्र या ई बस चार्जिंग करण्यासाठी पालिकेकडे केवळ एकच चार्जिंग केंद्र आहे. या चार्जिंग केंद्राच्या अभावामुळे पालिकेच्या बहुतांश ई बस या धूळखात उभ्या असल्याचे चित्र दिसून आले आहे.

वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागा कडून सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते ६५ हजार इतके प्रवासी प्रवास करतात.मात्र शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेने या बसेस सुद्धा अपुऱ्या पडत आहे. तर काही ठिकाणच्या मार्गावर ही बसेस कमी फेऱ्या असल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होत असते.

प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी व शहरातील प्रदूषण कमी व्हावे व पर्यावरण संतुलन राखले जावे यासाठी पालिकेने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत या ई बस खरेदी केल्या आहेत. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ४० ई बस दाखल झाल्या असून त्यातील निम्म्या बसेस या रस्त्यावर धावत आहेत. ई बस या विजेवर चालणाऱ्या असल्याने त्याला चार्जिंग केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु सद्यस्थितीत पालिकेचे मुख्यालयाच्या मागील बाजूस एकमेव चार्जिंग केंद्र आहे आहे. त्याठिकाणी ई बस चार्जिंग केल्या जात आहे.मात्र चार्जिंग केंद्र अपुरे असल्याने पूर्ण क्षमतेने ई बस चार्जिंग करणे शक्य होत नाही.

त्यामुळे पालिकेच्या बहुतांश बस या जागीच धूळखात उभ्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून या ई बस खरेदी केल्या आहेत. अशा प्रकारे बस प्रवाशांच्या सेवेत येण्याऐवजी जागीच उभ्या राहिल्या तर नादुरुस्त होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा रस्ते सफाई यंत्रणा खरेदी केली होती ती सुद्धा अशाच प्रकारे अनेक महिने धूळखात उभी असल्याचे दिसून आले होते.

पालिकेच्या ई बस शहरात विविध मार्गावर चालविल्या जात आहेत. नवीन चार्जिंग केंद्र उभारणीचे काम सुरू केले आहे. ते झाल्यास पूर्ण क्षमतेने ई बस सेवा देण्यास मोठी मदत होईल. -नानासाहेब कामठे, उपायुक्त (परिवहन) वसई विरार महापालिका

नवीन चार्जिंग केंद्र उभारणीचे काम सुरू

शहरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेने ई बस खरेदी करण्यावर भर दिला आहे. ४० ई बस जरी दाखल झाल्या असल्या तरीही त्या चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग केंद्र अपुरे आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्राचा विचार करता शहरातील अन्य भागातही बस चार्जिंग करण्यासाठी केंद्रांची गरज आहे. त्या अनुषंगाने पालिकेने सातीवली, नालासोपारा आणि नवघर या तीन ठिकाणी चार्जिंग केंद्राचे नियोजन केले असल्याचे पालिकेने सांगितले आहे. नवघर आणि नालासोपारा येथे महावितरण कडून चार्जिंग केंद्र उभारणीच्या विद्युत काम सुरू केले असून यासाठी १४ कोटी ७ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.

पूर्व नियोजन करणे गरजेचे

पालिकेकडून ई बस यासह अत्याधुनिक यंत्रणा खरेदी केल्या जातात. नागरी सोयी सुविधांच्या दृष्टीने त्या अत्यंत महत्त्वाच्या देखील आहेत. परंतु त्या यंत्रणा प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या पूर्ण करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अन्यथा इतका खर्च करूनही त्या यंत्रणा धूळखात उभ्या कराव्या लागतात यासाठी आधीच पूर्व नियोजन करण्यावर भर द्यावा अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.