लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसई विरार महापालिकेच्या विरार येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीत पडून पालिका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. कैलास राऊत (५१) असे या कर्चमार्‍याचे नाव असून ते या केंद्रात पंपमन म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी विरार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील मराठी शाळेजवळ पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. धरणातून आलेले पाणी या केंद्रात शुद्ध करून वितरीत केले जाते. या केंद्रात पंपम्हणून काम करणारे कर्मचारी कैलास राऊत हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ७ वाजता कामावर आले होते. टाकीची पाहणी करण्यासाठी ते वर चढले होते. मात्र बराच वेळ ते खाली आले नव्हते. सकाळी ९ च्या सुमारास इतर कर्मचार्‍यांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांची चप्पल टाकीजवळ आढळली.

आणखी वाचा-ट्रकचालकांचे पुन्हा आंदोलन, मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी

कर्मचार्‍यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर टाकीतून राऊत यांचा मृतदेह काढण्यात आला. पाण्यातून कचरा काढायचा असल्याने टाकी उघडी असते. राऊत हे नियमित पंप सुरू करण्याचे काम करत होते. परंतु आज ते कसे पडले याबद्दल आम्हाला धक्का बसला आहे असे या केंद्रात काम करणारे वॉलमन विशाल वैद्य यांनी सांगितले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कैलास राऊत हे विरारच्या आगाशी गावातील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. गेल्या २२ वर्षांपासून ते महाापालिकेच्या सेवेत कार्यरत होते.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal employee died after falling into water treatment plant tank in virar mrj
Show comments