वसई: वसई-विरार महापालिकेने शहरातील नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला होता. परंतु मागील काही महिन्यांपासून हा क्रमांक बंद येत असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.
वसई विरार शहरात पालिकेतर्फे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. यातच आता नव्याने शहरातील नागरीकरण वाढत असल्याने नागरिकांच्या गरजाही वाढत आहेत. याशिवाय विविध ठिकाणच्या भागात निर्माण होणाऱ्या समस्या, पालिकेच्या निगडित असलेल्या विषयांची चौकशी करणे व उपाययोजनांच्या संदर्भात सूचना करणे यासाठी नागरिकांना पालिकेशी थेट संपर्क साधता यावा यासाठी हेल्पलाइन ( टोल फ्री) क्रमांक सुरू करण्यात आला होता. १८००२३३४३५३ असा नंबर आहे. या क्रमांकावर संपर्क साधून शहरातील नागरिक विविध समस्या , तक्रारी व इतर सूचना मांडत होते. याशिवाय नागरिकांना माहिती नसलेल्या विविध विभागाशी संपर्क साधला जात होता. यात पालिकेच्या विविध सेवा-सुविधांबाबत माहिती घेणे तसेच दिवाबत्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा अशा विविध विभागांशी संबंधित तक्रारी या टोल फ्रीह्णमुळे नागरिकांना पालिकेत थेट करता येत होत्या. परंतु मागील काही महिन्यांपासून हा क्रमांकच बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
पालिकेच्या विविध कामे व संबंधित विभागाची माहिती मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांक असणे गरजेचे आहे. आधी टोल फ्री नंबर होता त्यावेळी विविध तक्रारी व इतर उपाययोजना याबाबत संपर्क साधने सोपे जात होते. आता क्रमांक बंद असल्याने अडचणी येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर पाटील यांनी सांगितले आहे.पालिकेने नागरिकांची गैरसोय लक्षात घेत टोल फ्री क्रमांक आद्ययावत करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Story img Loader