वसई : मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या काही बस खीळ खिळ्या झाल्या असल्याचे दिसून येत आहे. अशा धोकादायक अवस्थेत प्रवाशांना या बस मधून प्रवास करावा लागत असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मागील काही वर्षापासून मीरा भाईंदर शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. शहरातील नागरिकांना विविध ठिकाणच्या मार्गावर ये जा करण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाकडून बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ७४ डिझेल बस व ५७ ई बस अशा एकूण १३१ बस उपलब्ध आहे.या बस द्वारे शहरातील विविध ठिकाणच्या २७ मार्गावर सेवा दिली जात असून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र परिवहन सेवेच्या काही बसेस फारच जुन्या झाल्या आहेत. तर काही बसेस च्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने बसेसची अत्यंत बिकट अवस्था झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.अशा दुरवस्था झालेल्या बसेसची प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

बसण्याची आसन व्यवस्था, बसच्या समोरील काच तुटलेली, समोर भाग फुटलेल्या अवस्थेत, ब्रेक न लागणे, बसच्या अनेक भागातील पत्रे निघालेले, याशिवाय सातत्याने तांत्रिक बिघाड यामुळे याचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. कालबाह्य झालेल्या बसेस आहेत.तांत्रिक बिघाड झाल्यानंतर केवळ बसेसची तात्पुरता डागडुजी करून त्या वापरात आणल्या जात आहे. विशेषतः वाहनचालक यांना ही अशा अवस्थेत असलेल्या बस चालविताना अडचणी येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.पालिकेच्या बहुतांश बसची खूपच दुरवस्था झाली आहे. याबाबत सातत्याने परिवहन विभागाकडे तक्रारी करीत असतो मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने प्रवाशांना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांनी सांगितले आहे. परिवहन विभागाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये त्या आधीच या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ही जांभळे यांनी पालिकेकडे केली आहे.

तपासणी करण्याची मागणी

प्रवाशांना सुखकर व सुरक्षित प्रवास कसा मिळेल यावर पालिकेच्या परिवहन विभागाची प्राथमिकता असायला हवी. यासाठी शहरातील परिवहन सेवेच्या बस सुरक्षित आहेत किंवा नाही याचे वेळोवेळी लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने सर्रासपणे खीळ खिळ्या झालेल्या बसेस वापरात आणल्या जात आहेत त्यामुळे याचा त्रास बस चालकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यासाठी शहरातील बसेसची तपासणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पालिकेकडून बसेसची वेळोवेळी तपासणी

मीरा भाईंदर शहरात परिवहन विभागाकडून प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतात. ज्या बसेस नादुरुस्त होतात. त्यांच्या तपासणीसाठी पथक असून वेळोवेळी सर्वच बसची तपासणी केली जाते असे महापालिकेचे उपायुक्त (परिवहन) स्वप्नील सावंत यांनी सांगितले आहे. ज्या प्रवाशांच्या बसेसच्या संदर्भात तक्रारी असतील त्याचे निराकरण केले जाते असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आता ३० बसेस मधील आसन व्यवस्था सुद्धा नवीन टाकण्याचे काम परिवहन विभागाने सुरू केले आहे असे सावंत यांनी सांगितले आहे.