वसई : वसई-विरार महापालिका सध्या हर घर तिरंगा या मोहिमेच्या कामात गुंतली असून त्यामुळे इतर मोहिमा आणि दैनंदिन कामावर परिणाम होऊ लागला आहे. पालिकेला या मोहिमेची जनजागृती, निधी संकलन तसेच ध्वज वितरित करण्याचे मोठे आव्हान आहे.
केंद्र शासनाने ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाच्या घरावर राष्ट्रध्वज लावण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याची अमंलबजावणी करण्याचे काम महापालिकांवर सोपवले आहे. आता या मोहिमेसाठी जेमतेम महिना हातात उरला असून पालिकेची धावपळ सुरू झाली आहे. पालिकेला ध्वज विक्रेत्याकडून दीड लाख ध्वज खरेदी करून नागरिकांना वितरित करायचे आहे. ध्वज विक्रेता शोधणे, त्याची ऑर्डर देणे आणि वेळेत बनवून ते नागरिकांपर्यंत वितरित करण्याचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे. याशिवाय नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागणार आहे. ही केंद्र शासनाची योजना असल्याने पालिकेला प्राधान्याने ती पूर्ण करावी लागत आहे.मात्र यामुळे पालिकेला आपली सर्व कामे बाजूला हर घर तिरंगा मोहिमेचे काम हाती घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम इतर दैनंदिन काम आणि मोहिमांवर होत आहे.
मोहिमेमुळे कामावर परिणाम
सध्या अतिवृष्टी सुरू असून आपत्काकालीन यंत्रणेवर लक्ष द्यायचे आहे. याशिवाय प्लास्टिक बंदीची मोहीम राबवायची आहे. परंतु या हर घर तिरंगा मोहिमेमुळे कामावर परिणाम होत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दररोज ७ दिवस राष्ट्रध्वज नियमानुसार लावून उतरवावा लागणार आहे. ध्वजसंहितेची माहिती नागरिकांना नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याचीदेखील शक्यता आहे.