प्रसेनजीत इंगळे
विरार : ‘लोकसत्ता’च्या बोगस डॉक्टर विरोधातील मोहिमेची दखल घेऊन गुन्हे शाखेने शहरातील बोगस डॉक्टरांची धरपकड सुरू केली आहे. मात्र हे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाचे असताना हा विभाग ढिम्मच आहे. पालिकेने मागील चार वर्षांत एकही बोगस डॉक्टर पकडला नसल्याचे समोर आले आहे. अनेकदा तक्रारी देऊनही पालिकेने काहीच कारवाई न केल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सोमवारी एकाच वेळी २४ संशयित बोगस डॉक्टरांवर छापे टाकत तीन बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. परंतु यासंदर्भात पालिकेचे कोणतेच सहकार्य मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बोगस डॉक्टरांची माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाला २ महिन्यापूर्वीच दिली होती. पण पालिकेने याबाबत कोणतेही गांभीर्य दाखविले नाही. यामुळे पोलिसांना सदरची कारवाई करावी लागली. पोलिसांच्या या आरोपाचे खंडन करताना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले की, आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. उलटपक्षी बोगस डॉक्टरांच्या कारवाई मोहिमेत पोलिसांची सुरक्षा मिळत नसल्याने पालिकेला अडचणी येत आहे.
एकूणच पालिका आणि पोलीस यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र समिती नाही. केवळ समिती गठन करण्याचे काम सुरू असल्याचे पालिका सांगत आहे. वसईतील बोगस डॉक्टर हेमंत पाटीलविरोधातसुद्धा अनेक तक्रारी प्राप्त होऊनही पालिकेने कारवाई केली नव्हती. पालिकेच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत पाटील यांनी हेमंत पाटील याला केवळ दवाखान्याची नोंदणी करण्याचे पत्र पाठवले होते. बोगस डॉ. सुनील वाडकर याचा लोकसत्ताह्णने पर्दाफाश केल्यानंतर पालिकेने हेमंत पाटील याच्याविरोधात वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. लोकसत्ता ने सातत्याने बोगस डॉक्टरांच्या विरोधात लिखाण केल्या नंतर पालिकेला जाग आली. शहरातील सर्वच डॉक्टरांना आपली कागदपत्रे पडताळणी सादर करण्याचे आदेश दिले. पण त्यातील किती डॉक्टरांनी कागदपत्रे सादर केली त्याची कोणतीही आकडेवारी, माहिती पालिकेकडे नाही. पालिकेने प्रत्येक महिन्याला बोगस डॉक्टरांचा शोध घेणे आवश्यक असून याचा अहवाल जिल्हादंडाधिकारी, तथा अध्यक्ष पुनर्विलोकन समिती याच्याकडे दरमहा सादर करणे बंधकारक आहे. मात्र पालिकेने असे कोणतेही अहवाल सादर केले नाहीत. नवे परवाने देताना डॉक्टरांचे प्रमाणपत्र पदवी तपासून त्याची खात्री करून त्यांना परवाने देणे आवश्यक असताना पालिकेने सरसकट परवाने दिल्याचेही म्हटले जाते.
बोगस डॉक्टरांवर पोलिसांकडून कारवाई..
शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार हे केवळ महापालिकेच्या आरोग्य विभागाला असतात. कोणता डॉक्टर अधिकृत आणि कोणता बोगस याची शहानिशा केवळ पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला करता येते. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीशिवाय पोलीस बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करू शकत नाही. यामुळे पालिकेने बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु वसई-विरार पालिकेचा आरोग्य विभाग काहीच करत नसल्याने पोलिसांवरच ही कारवाई करण्याची वेळ आली असून पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोगस डॉक्टरांची माहिती कळवूनही ते काहीच कारवाई करत नसल्याचा खुलासा गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.