वसई : मालमत्ता करापाठोपाठ पालिकेने शहरात लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवरही कर आकारणी सुरू केली आहे. आजपर्यंत जाहिरात फलकातून पालिकेने पावणे दोन कोटी रुपये वसुली केली आहे. जाहिरात कराची आजपर्यंतची पालिकेची ही विक्रमी वसुली आहे. वसई विरार शहरात जाहिरात धोरण निश्चित नसल्याने सुरुवातीला कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरात अनधिकृतपणे व मिळेल त्या जागी विविध प्रकारचे जाहिरात फलक लावले जात होते. यामुळे पालिकेला यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर पालिकेला पाणी सोडावे लागत होते. यावर निर्बंध आणण्यासाठी व पालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पालिकेने शहरातील अनधिकृत फलक हटवून स्वत: जाहिरात फलक व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी स्वत: पालिका जाहिरात फलक लावण्याची परवानगी देऊन त्यांच्याकडून कर वसूल केला जात आहे. यातून पालिकेचा उत्पन्नाचा चांगला स्रोत विकसित झाला असून चांगला करही मिळू लागला आहे. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत जाहिरात करापोटी पावणे दोन कोटी रुपये इतका कर वसूल करण्यात आला असल्याची माहिती कर संकलन विभागाकडून देण्यात आली आहे. जाहिरात करातून ५ ते ६ कोटी रुपये इतकी रक्कम मिळणे अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने कर वसुली व बेकायदेशीरपणे फलक लावत त्यांच्यावर कारवाई करण्याचे कामही सुरूच ठेवले आहे. मुदतीत कर भरणा न करणाऱ्या जाहिरातदारांना नोटिसा जाहिरात कर भरणा करण्याची अंतिम मुदत ही १५ डिसेंबर ही होती. या मुदतीत ज्यांनी जाहिरात कराची रक्कम भरली नाही. त्यांना दंडासहित नोटिसा काढण्यात आल्या आहेत. जवळपास ४० ते ५० जाहिरातदारांना नोटिसा काढल्या आहेत. जे कर भरणा करीत नाहीत त्यांच्यावर सोमवारपासून कारवाई सुरू केली जाणार आहे. तसेच महामार्गावरही लावण्यात आलेल्या जाहिरात फलकावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे उप- आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले आहे. जाहिरात कर वसुलीचे कामही ज्या प्रमाणे नियोजन केले आहे त्यानुसार सुरू आहे. आतापर्यंत जाहिरात कराची पावणे दोन कोटी रुपये इतकी वसुली झाली आहे. - प्रदीप जांभळे पाटील, उप-आयुक्त कर संकलन विभाग महापालिका