लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई : नालासोपाऱ्यातील धानिव बाग येथे सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा पेल्हार पोलिसांनी लावला आहे. सायराबानू शाह असे या महिलेचे नाव असून अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडझाले आहे
मंगळवार २८ मे रोजी नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग येथील डोंगराखाली असलेल्या ओव्हळात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली होती. मात्र तिची ओळख पटत नव्हती. या प्रकरणी पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मयत महिलेच्या पतीचा भाचा नजाबुद्दीन सम्मी (२१) याला दिल्ली येथून अटक केली आहे. मयत महिला सायराबानू शाह (३४) असे या मयत महिलेचे नाव आहे.
आणखी वाचा-वसई : महामार्गावरील वाहतूक कोंडी जीवावर बेतली; तीन अपघातात ४ दुचाकीस्वारांचा मृत्यू
…असा लावला लावला छडा
पोलिसांना महिलेची ओळख पटविणे आणि मारेकरी शोधणे अशा दोन्ही कसोट्यांवर काम करण्याचे आव्हान होते. पोलिसांना मृतदेहाजवळ एक वापरलेले कॉण्डम आणि एक स्प्रे आढळून आला. तोच दुवा पकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केला. त्या स्प्रेवर असलेल्या बॅच वरून पोलिसांनी परिसराती सर्व मेडिकल दुकानात तपास सुरू केला. त्यावेळी एक अनोळखी तरून शुक्रवार २४ मे रोजी हा स्प्रे घेऊन गेल्याची माहिती मिळाली. परंतु तो तरूण कोण होता त्याचा उलगडा होत नव्हता. दरम्यान, महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तिच्या पोशाखावरून ती मुस्लिम असल्याचा तर्क लावला. त्यावरून परिसरातील मतदार याद्यांमधील मुस्लिम महिलांची नावे तपासली आणि त्यावरून शोध घेण्यास सुरवात केली. धानिवबाग येथील एका घरात जियाउल शहा याच्या घरात मयत महिलेचा फोटो घेऊन विचारपूस करण्यासाठी गेले. तेव्हा मयत महिला जियाउल याची पत्नी असल्याचे समजले. ती मागील ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला मेडिकल दुकानातून त्या तरूणाचे सीसीटीव्ही चित्रण दाखवले. तेव्हा तो तरूण जियाऊल याचा भाचा असून दिल्लीत गेल्याची माहिती दिली.
आणखी वाचा-वसई: यूट्यूबर निघाला चोर, चोरी प्रकरणात अटक
…दिडशे बेकर्या पालथ्या घातल्या
आरोपी नजाबुद्दीन हा दिल्लीत पळून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक तात्काळ दिल्लीला रवाना झाले. तो एका बेकरीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी दिल्लीच्या अमनविहार परिसरातील सुमारे दिडशे बेकर्या पालथ्या घातल्या. तेव्हा एका बेकरीत तो काम करत असलेला आढळून आला. आरोपी नजाबुद्दीन आणि मयत सायराबानू यांचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र नजाबुद्दीनने लग्न केल्याने सायराबानू संतप्त झाली आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे नजाबुद्दीनने तिची हत्या केल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले.
परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षख सोपान पाटील, तुकाराम भोपळे, सुरेंद्र शिवदे,बाळासाहेब घुटाळ, योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्विम पाटील आदींच्या पथकाने या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली.