मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत ससूनवघर जवळील जंगल परिसरात गुटख्याची तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.या प्रकरणी नायगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून गुटखा व वाहनांसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसई विरार मध्ये विविध ठिकाणी छुप्या मार्गाने अंमली पदार्थांची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा >>> मुलीचा संसार विस्कटल्याने वृध्द आईची आत्महत्या; मीरा रोड मधील घटनेने हळहळ
नुकताच नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत ससूनवघर जवळपास असलेल्या जंगल परिसरात छुप्या मार्गाने गुटख्याची तस्करी होत होती. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी पथक तयार करून २२ ऑगस्ट रोजी रात्री छापा टाकला यावेळी गुटख्याची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी नायगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. फिरोज मनसुरी (३२), सचिन निर्मळ(३६), हिरनाथ गंगर( ३९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या कडून २८ लाखांचा गुटखा व एक ट्रक व सात छोटे हत्ती टेम्पो असा सुमारे १ कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा >>> वसई-विरारमधील अनधिकृत इमारत प्रकरण : कर्जे देणाऱ्या २३ बँका, पतसंस्थांवर पोलिसांची नजर
सदरची कारवाई नायगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बलराम पालकर, पोलीस उपनिरीक्षक संविधान चौरे, गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी सांगितले आहे.