वसई : उन्हाळ्याच्या झळा अधिकच तीव्र होत असतानाच शहराच्या विविध ठिकाणच्या भागात पाणी प्रश्न पेटू लागला आहे. अनियमित व कमी पाणी पुरवठा होत असल्याने शुक्रवारी नायगाव येथील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व राहिवासीयांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले.
मागील काही वर्षांपासून नायगाव पूर्वेच्या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे या भागात पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा केला जातो. मात्र ते पाणीसुद्धा अपुरे असून जो पाणी पुरवठा होतो तो ही अनियमित होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील पाणी समस्या सुटावी यासाठी पालिकेने ५०० मी मी व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार होती. मात्र त्या वाहिनी कार्यान्वित करण्यात न आल्याने समस्या अधिकच बिकट बनू लागली आहे. या पाण्याच्या संदर्भात शुक्रवारी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चेतन घरत व इतर कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले.
महापालिका पाणी पुरवठा करताना भेदभाव करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आज नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
एकीकडे आम्ही कर भरतो तसेच आता पालिका पाणी पट्टी कर वाढ करण्याचा विचार करते त्यासाठी आधी नागरिकांना मुबलक पाणी द्या असे सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा घरत यांनी सांगितले आहे. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलन कर्त्यांनी पालिकेच्या कारभारा विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
आंदोलन स्थळी महापालिकेचे उपायुक्त समीर भूमकर , पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी भेट दिली. येत्या १५ दिवसात जलवाहिन्याचे काम पूर्ण होईल तेव्हा पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
रस्ते, गटारे कामे मार्गी लावा
नायगाव पूर्वेच्या भागात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची बिकट अवस्था होते. याशिवाय सांडपाणी निचरा होण्यासाठीही गटार व्यवस्था नसल्याने ते दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर येते. याच घाणीच्या पाण्यातून वाहनचालक, पादचारी नागरिक व शाळकरी मुलांना प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यासाठी रस्ते व गटार व्यवस्था यांची कामे मार्गी लावावीत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
पालिकेकडून राजकारण केल्याचा आरोप
बहुजन विकास आघाडीची सत्ता असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विविध प्रकारची विकास कामे मंजूर करवून घेतली आहेत. मात्र वसई विरार शहरात सत्ता बदल झाल्यानंतर मंजूर झालेली रस्ते, गटार, जलवाहिन्यांची कामे पूर्ण केली जात नाही . यात पालिका अधिकारी राजकारण करीत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे. यापूर्वी कधी आम्हाला आंदोलन करावे लागत नव्हते आता मात्र प्रथमच असे आंदोलन करावे लागले आहे असेही नागरिकांनी सांगितले आहे.