वसई: नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोड सर्वोदय वसाहत मुकुंद स्मृती अपार्टमेंटमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली दोन जण जखमी झाले आहेत. नालासोपारा पूर्वेच्या टाकीरोड परीसरात सर्वोदय वसाहत मुकुंद स्मृती अपार्टमेंटची चार मजली इमारत आहे. ही इमारत १५ ते २० वर्षे जुनी आहे.
त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता या इमारतीच्या दुसऱ्या माळावरील एका खोलीचा स्लॅब अचानकपणे कोसळला. हा स्लॅब कोसळून थेट पहिल्या माळावर बंद असलेल्या खोलीत पडला. त्यामुळे दुसऱ्या माळावर राहणारे शिंदे दाम्पत्य यात जखमी झाले आहे. संदीप सदानंद शिंदे (५३), अनिता संदीप शिंदे (४६) अशी जखमींची नावे आहेत. सुरवातीला त्यांना सर्वोदय वसाहतीत राहणारे महेंद्र कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र जास्तीचा मार लागला असल्याने त्या पुढील उपचारासाठी मुंबईच्या नायर व शालीनी ताई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा : वीज ग्राहक सेवा केंद्र २५ दिवसांपासून बंद, निविदा प्रक्रियेच्या विलंबाचा नागरिकांना फटका
पालिकेने ही इमारत धोकादायक असल्याने यापूर्वी नोटीस बजावली होती असे सांगण्यात येत आहे. या घडलेल्या घटनेनंतर पालिकेच्या कर्मचारी अधिकारी घटनास्थळी न गेल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.