वसई : नालासोपारा रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने तिकीट तपासनीसाला मराठी भाषेत बोलण्यास सांगिल्याने त्या प्रवाशालाच डांबून त्याच्याकडून माफिनामा लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मराठी एकीकरण समिती आक्रमक झाल्यानंतर संबंधित तिकीट तपासनिसला निलंबित करण्यात आले असून पश्चिम रेल्वेनेही याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी रात्री नऊच्या सुमारास एका मराठी भाषिक दांपत्याला नालासोपारा रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस रितेश मौर्या यांनी अडवून तिकिट विचारले. या दांपत्याने मोर्या यांना मराठीत बोला असे सांगितले.त्यावरून मोर्या यांना राग आला आणि शाब्दिक बाचाबाची झाली. मौर्या यांनी या दांपत्याला थेट पोलीस ठाण्यात नेले आणि त्यांना दमदाटी करून माफीनामा देऊन घेतला. या पुढे मराठीचा आग्रह केला तर कायदेशीर कारवाई करू, अशी धमकी प्रवाशाला देण्यात आली होती.

हेही वाचा : वसई नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मराठी एकीकरण समिती आक्रमक

या प्रकाराची माहिती मराठी एकीकरण समितीला सोमवारी मिळाली. संतप्त झालेल्या एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री नालासोपारा स्थानकातिल स्टेशन मास्तर च्या कार्यालयाला घेराव घालत जाब विचारला.अशा प्रकारे प्रवाशांना दमदाटी करून मराठी भाषेचा अनादर करणे चुकीचे आणि संतापजनक असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा तिरस्कार करणे चुकीचे आहे. अशा प्रकारे मराठी भाषेची गळचेपी खपवून घेणार नाही असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.

तिकीट तपासनीस रितेश मौर्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. मराठी एकिकारण समितीच्या आक्रमक भूमिकेनंतर रेल्वेने तिकीट तपासनीस मोर्या यांचे निलंबन करून त्याची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा : भाईंदरमध्ये १७ उमेदवार रिंगणात, ६ जणांची माघार, भाजपमधील बंडखोरी शमली, गीता जैन यांना ‘फलंदाज’ चिन्ह

रेल्वेकडूनही दिलगिरी व्यक्त

या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पश्चिम रेल्वेनेही याप्रकरणी ‘एक्स’ वर ( पूर्वीचे ट्विटर) दिलगिरी व्यक्त केली आहे. पश्चिम रेल्वे देशातील सर्व भाषा आणि आपल्या सर्व प्रवाशांचा सन्मान करते व विविधतेत एकतेवर विश्वास ठेवते. आमच्यासाठी सर्व धर्म, भाषा, प्रदेशातील प्रवासी समान आहेत, त्यांना उत्तम सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे. वरील विषयाची चौकशी केली जाईल आणि काही दोष आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे पश्चिम रेल्वेने या ट्विटवर म्हटले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nala sopara railway station ticket collector tc ill treatment to marathi speaker passenger css