वसई- आपल्या ६ वर्षीय मामेबहिणीची हत्या करणार्‍या १३ वर्षीय मुलाच्या क्रुरतेने पोलीस देखील चक्रावले आहे. कुख्यात सिरियल किलर रामन राघव याच्यावरील सिनेमा पाहून हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली.

आरोपी १३ वर्षांचा असून नालासोपारा पूर्वेच्या श्रीराम नगर येथील मिश्रा चाळीत राहतो. त्याच्याच शेजारी त्याचा मामा मोहम्मद रमजान खान राहतो. मामाची मुलगी शिद्राखातून ही ६ वर्षांची आहे. कुटुंबातील सर्वजण शिद्राखातूनचा लाड करायचे. ते आरोपीला सहन होत नव्हते. त्यामुळे त्याने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने शनिवारी दुपारी शिद्राखातूनला खेळायला जवळच्या डोंगरावर नेले. तेथे झाडावरून आंबे काढून देतो असे तिला सांगितले. ती बेसावध असताना तिचा गळा दाबला. त्यानंतर ती मरण पावली. मात्र त्यानंतरही त्याने जवळ पडलेला मोठा दगड उचलून तिच्या डोक्यात घातला अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत माहिती देताना पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, हत्या करणारा मुलगा १३ वर्षांचा असला तरी पोलिसांना तो सराईतपणे उत्तर देता होता. त्याला आपल्या कृत्याचा पश्चातापही दिसला नाही. त्याला हॉरर सिनेमे बघण्याची आवड होती. कुख्यात सिरियल किलर रामन राघव याच्यावर आलेला सिनेमा पाहून तो प्रभावित झाला होता. रामन राघव ज्या प्रमाणे डोक्यात दगड घालून हत्या करतो त्यानुसार मी देखील तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

हत्या केल्यानंतर घरात मोबाईल बघत होता…

शनिवारी संध्याकाळी शिद्राखातून बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांची शोधाशोध सुरू झाली. आरोपीचे कुटुंबिय देखील तिचा शोध घेत होते. मात्र शिद्राखातूनची हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या घरात निवांतपणे मोबाईल बघत होता. जेव्हा कुटुंबियांना तो शिद्राखातूनला डोंगरावर जाताना दिसल्यानंतर त्यांनी विचारपूस केली तेव्हा देखील त्याने मला पुढे काय झालं ते माहित नाही सांगितलं. नंतर रात्री एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात डोंगरावरून तो एकटाच येत असलेला दिसला. तेव्हा मात्र त्याने एक बनवाट कथा सांगितली आम्ही डोंगरावर खेळायला गेलो होते. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी शिद्राखातूनची हत्या केली आणि मी घाबरून पळून आलो असे उत्तर दिले. तेव्हा देखील तो निर्विकार होता अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader