वसई – सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वसई विरार शहरात झोपडपट्ट्याही सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे. मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसनन प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात वसई विरार मध्ये २ लाख ३२ हजार १४२ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील सर्वाधिक १ लाख १९ हजार ७०३ झोपडपट्ट्या या नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार विभागात आहेत.

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत.सरकारी, वनविभाग तसेच पालिकेच्या आरक्षित जागा बळकावून चाळी तयार केल्या जात आहेत. त्यामुळे शहर बकाल बनू लागले आहेत. ठाण्याच्या मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसनन प्राधिकरणाने नुकचे वसई विरार शहरात सर्वेक्षण केले होते. त्यानुसार वसई विरार शहरात २ लाख ३२ हजार १४२ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे १ लाख १९ हजार ७०३ झोपडपट्ट्या या नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार विभागात आहे. त्यापाठोपाठ प्रभाग समिती जी ( २१ हजार ४७४) प्रभाग समिती- ब (२० हजार २१९), प्रभाग समिती ड- आचोळे (१० हजार २४०) प्रभाग समिती- सी( ४ हजार ८६२) एवढ्या झोपडपट्ट्या आहेत. २००१ मध्ये शहराच्या एकूण लोकसंख्येच्या ९ लाख २८ हजार लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये रहात होती असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या नियम ४ अ अन्वये एकाही झोपडपट्टीला झोपडपट्टी म्हणून मान्यता देण्यात आलेली नव्हती.

विरार, नवघर, वसईत कमी झोपडपट्ट्या

वसई विरार पूर्वेला चाळी आणि झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत असताना शहराच्या पश्चिमेला मात्र झोपडपट्ट्यांचे प्रमाण कमी आहे. विरार पश्चिमेच्या प्रभाग समिती (अ) बोळींज येथे २९८, वसई पश्चिमेच्या नवघर माणिकपूर प्रभाग समिती एच मध्ये ७१७ तर प्रभाग समिती आय मध्ये ३ हजार ७६८ एवढ्या झोपडपट्ट्या आहेत.

Story img Loader