लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : नालासोपारा मतदारसंघाची मतमोजमी विरार पश्चिमेच्या चिखलडोंगरी येथील समर्थ इंटरनॅशनल शाळेत होणार आहे. हा मतदारसंघ संवेदनशील असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी मतमोजमी केंद्राबाहेर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्या संदर्भातील अधिसूचना पोलीस उपायुक्तांनी प्रसिध्द केली आहे.
नालासोपारा मतदारसंघ सर्वात संवेदनशील घोषीत करण्यात आला आहे. मतमोजणी ही विरार पश्चिमेच्या चिखलडोंगरी येथील समर्थ इंटरनॅशनल शाळेत होणार आहे. त्यामुळे या मतमोजणी केंद्राबाहेर आणि परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतमोजणी केंद्राच्या बाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
आणखी वाचा-शेफ म्हणून नेले आणि मजूर बनवले, मालदीवमधून तरुणाची भरोसा कक्षाने केली सुटका
मतपेट्या असलेल्या स्ट्रॉंग रूम समोरून जाणारा मुख्य रस्ता हा पुढे चिखलडोंगरी गावात तसेच म्हारंबळपाडा गावात जातो. त्यामुळे या गावात जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे या रस्त्यावरून गावात जाण्यासाठी एक चारकाची वाहन जाईल एवढाच रस्ता स्थानिकांसाठी तसेच अत्यावश्यक सेवेसाठी खुला ठेवला आहे. उर्वरित सर्व प्रकारच्या वाहनांसाठी व नागरिकांसाठी हा रस्ता बंद करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) जयंत बजबळे यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) प्रमाणे तसेच मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्रवेश बंदची अधिसुचना काढण्यात आली आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आणखी वाचा-“काल भिजलेल्या कोंबडीप्रमाणे, आज कंठ फुटला” विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल
नालासोपाऱ्यात मतमोजणीच्या १८ फेऱ्या
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातही मतमोजणी साठी प्रशासन सज्ज झाले आहे. नालासोपारा मतदारसंघात ५०४ मतदान केंद्रावर मतदान झाले होते. यात ३ लाख ४९ हजार ११० इतके मतदान झाले आहे. या मतांची मोजणी विरारच्या समर्थ इंटरनॅशनल शाळेत मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी २८ टेबल लावण्यात आले असून मोजणीच्या १८ फेऱ्या होणार आहेत.
प्रत्येक मतमोजणी टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक तसेच मायक्रो ऑब्झर्व्हर यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदार संघात भारत निवडणूक आयोगाकडून एका निवडणूक निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरवातीला टपाली मत मोजणी आणि त्यानंतर ईव्हीएम मधील मतांची मोजणी केली आहे.