लोकसत्ता प्रतिनिधी 

वसई : वसई पूर्वेच्या कामण देवदल भागात पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक नाल्यात माती भराव व बांधकाम करून नाला बुजविण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वसई पूर्वेच्या भागात कामण देवदल परिसर आहे. मागील काही वर्षापासून या भागात औद्योगिकरण व नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. याच भागातील देवदल जाधव वाडी येथे सर्व्हे क्रमांक ११/ड/४ याला लागूनच पावसाचे पडणारे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला आहे. याच नाल्यातून पावसाळ्यात पूर्वेच्या डोंगर माथ्यावरून पडणारे पावसाचे पाणी हे याच नाल्यातून वाहून जाते.

आता मात्र भूमफियांनी याच नाल्यात माती भराव टाकून  नैसर्गिक नाला बुजविला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याशिवाय या नाल्यात सिमेंट काँक्रिटचे बांधकाम ही करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे  निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नाल्याच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहत आहे. जर नाल्यातून पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला तर पावसाचे पाणी सरळ या नागरिकांच्या घरात जाऊन जिवीतहानी व वित्तहानी होऊ शकते असे सामाजिक कार्यकर्ते अँड. दिनेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.

विशेषतः मागील काही वर्षांपासून या भागातील विविध ठिकाणच्या भागात नैसर्गिक नाल्यात माती भराव व पाणी जाण्याचे मूळ मार्ग बंद झाल्याने पूरस्थितीची समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. जर आणखीन नैसर्गिक नाले बंद झाले तर पाणी जाणार कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नैसर्गिक नाल्यात माती भराव करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने भूमफियां अधिकच सक्रिय होऊन नाल्यात अतिक्रमण करू लागले आहेत. या पालिकेने व तहसील विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

नैसर्गिक नाला बुजविणे हा प्रकार गंभीर असून संबंधित प्रभागातील अधिकाऱ्यांना सांगून पाहणी करवून पुढील कार्यवाही केली जाईल -संजय हेरवाडे,अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका

३० फुटांचा नाला ४ फुटांवर 

पूर्वेच्या भागाला डोंगर भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत असते. यासाठी देवदल भागात सुमारे तीस फुटांचा नाला होता. मात्र हळूहळू त्यात माती भराव टाकून अवघ्या चार फुटांवर आला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

तहसील विभागाकडून केवळ पंचनामा

नैसर्गिक नाल्यात माती भराव केल्याप्रकरणी वसईच्या तहसील विभागात येथील नागरिकांनी तक्रार दिली होती. तक्रार केल्यानंतर ७ जून २०२४ रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला होता. त्याचा अहवाल तयार करून तहसीलदार यांच्याकडे पाठविला होता.मात्र त्यानंतर पुढील कोणतीच कारवाई झाली नसल्याने आज या नैसर्गिक नाल्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.