भाईंदर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील धारावी देवी मंदिरातही नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
भाईंदर पश्चिम येथील समुद्रकिनारी वसलेल्या तारोडी गावात धारावी देवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर साधारण तीनशे वर्षांहून जास्त जुने आहे. मीरा-भाईंदर, नवी मुंबई, वसई आणि पालघर येथे वसलेल्या आगरी-कोळी समाजाची ही ग्रामदेवी मानली जाते. श्रीमंत पेशवे नरवीर चिमाजी अप्पा वसईच्या मोहिमेवर आले असताना त्यांनी या मंदिराची निर्मिती केली असावी, अशी आख्यायिका आहे.
मंदिराचे आता नूतनीकरण करण्यात आले आहे. नुकताच राज्य शासनाकडूनही त्यासाठी निधी मिळाला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरामध्ये धूप आरती, महापूजा, भजन, कीर्तन, हरिपाठ, गरबा नृत्य, पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम आई धारावी देवी न्यासातर्फे आयोजित करण्यात आले आहेत.