भाईंदर : मिरा रोड येथे शुक्रवारी झालेल्या गोळीबारीतील प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी नया नगर पोलिसांनी ७ पथके स्थापन केली आहेत. शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात शम्स अन्सारी उर्फ सोनू याचा मृत्यू झाला होता.
मिरा रोड येथील शांती शॉपिंग सेंटर मध्ये चष्माचे दुकान चालवणाऱ्या शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) या दुकानदारांची शुक्रवारी रात्री जवळून गोळी मारून हत्या करण्यात आली होती. अन्सारी दोन सहकार्यांसह दुकानाच्या बाहेर बोलत असताना तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका व्यक्तीने जवळून त्याच्यावर गोळी झाडली होती. मयत शम्स अन्सारी याते युसूफ आलम नावाच्या व्यक्तीबरोबर वैमनस्य होते. युसूफ ने केलेल्या एका गुन्ह्यात मयत अन्सारी साक्षीदार होता.
हेही वाचा…मिरा रोड मध्ये गोळीबारात दुकानदाराचा मृत्यू
युसूफने त्याला धमकावले देखील होते, अशी माहिती नया नगर पोलिसांनी दिली. नया नगर पोलिसांनी युसूफ याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी ७ पथके स्थापन करण्यात आली आहेत. सीसीटीव्हीच्या मामध्यामातून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांनी दिली.