लोकसत्ता प्रतिनिधी
वसई: नायगाव पूर्वेच्या भागात जूचंद्र उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना योग्य ते नियोजन न करता केले जात असल्याने या नियोजन शून्य कामाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. खडतर पर्यायी रस्ते, बेसुमार उडणारी धूळ, वाहतूक कोंडीची समस्या यामुळे येथून प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरात असलेल्या एल सी क्रमांक ९ या रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडी सुटावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षभरापूर्वी जूचंद्र रेल्वे फाटाकावर १ हजार ३८६ मीटर लांबीचा उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र या पुलाचे काम करताना ये जा करण्याच्या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांचे दुर्लक्ष झाले असल्याने येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आणखी वाचा-वसई : पालिकेचा आपला दवाखाना कंटेनरमध्ये; जागा आणि डॉक्टरांची अडचण कायम
पुलाचे काम सुरू असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूने पर्यायी रस्ते ठेवले आहेत. परंतु या पर्यायी रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. त्यामुळे या अरुंद झालेल्या रस्त्यांवरून वाहने घेऊन जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यामुळे वाहनांची गती कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट बनत असते. आणि जेव्हा फाटक बंद होते तेव्हा तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. तर दुसरीकडे हे दोन्ही बाजूने रस्ते धुळीने भरलेले असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य तयार होते. अशा धुळीने भरलेल्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाचे काम करताना वाहतूक ये जा करण्यासाठीचे योग्य ते नियोजन करायला हवे होते. मात्र सद्यस्थितीत त्यांच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. दररोज जूचंद्र, चंद्रपाडा , रेल्वे फाटक परिसर येथून जाताना खडतर रस्ते, सतत उडणारी धूळ, व वाहतूक कोंडी अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे फाटक परिसर व इतर रस्त्यांची दुरुस्ती केली तर तेथून प्रवास करणारी वाहने जलद गतीने निघून जातील यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
आणखी वाचा-अभिनेत्री बनण्याचं आमिष दाखवून शूट केले नग्न व्हिडीओ; पालघरमधील धक्कादायक प्रकार कसा झाला उघड?
प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना नाहीच
प्रकल्पांची कामे करताना प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना शासनस्तरावरून करण्यात येत आहेत. परंतु जूचंद्र उड्डाण पुलाच्या प्रकल्पासंदर्भात प्रदूषण नियंत्रण व प्रदूषण होऊ नये यासाठी कोणत्याच उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पुलाचे काम ही संथ गतीने
जूचंद्र उड्डाण पुलाचे कामही आता एकदम संथ गतीने सुरू आहे. मार्च २०२४ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते परंतु भूसंपादन अडचणी व इतर समस्या यामुळे हे काम लांबणीवर पडले आहे. आतापर्यंत केवळ ५५ टक्के इतकेच पुलाचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक कोंडी व रस्ते धूळ यातून सुटका व्हावी यासाठी या पुलाच्या कामाला गती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.