विरार : वसई-विरार शहर सुशोभीकरणात आता वृक्षांचे जतन, भिंतीवरील रंगकाम आणि कारंज्यांची भर पडणार आहे. या रंगकामांना पालिकेने शहराच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष देण्याचे काम सुरू केले आहे. त्यात शहरात ठीकठिकाणी नागरिकांना आकर्षित करणारे उपक्रम राबाविले जात आहेत.

पालिकेने शहरात कचऱ्याची ५६ठिकाणे शोधून काढली आहेत, या ठिकाणी पालिका कांरजे, संदेश देणारे पुतळे लावणार आहे. ५६ हजार दिवे बदलून त्या जागी एलईडीचे दिवे लावले जाणार आहेत. यातच  स्मार्ट पोलची संकल्पना राबवली जाणार आहे. सौंदर्यीकरणासाठी भित्तिचित्रे, दुतर्फा वारली चित्रे रेखाटण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेने भित्तिचित्र काढून शहराला सुंदर व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  नागरिकांनी पालिकेला सहकार्य कराव असे आवाहन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.

विविधतेचे दर्शन

स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणी असणारे पूल, मार्ग यासह विविध ठिकाणी रंगरंगोटी करण्यात येणार आहे. संस्कृती, गावपण, सामाजिक संदेश, वसईतील धार्मिक आणि पर्यटन स्थळे, वसईतील व्यवसाय, शेती  यासह विविध माध्यमांचे दर्शन वसईकरांना होणार आहे.

मीरा-भाईंदरचा रंग नवा

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना सुरू आहे. शहराची रंगरंगोटी करण्यासाठी पालिकेने खासगी संस्थांची मदत घेतली होती. आता शहरातील मुख्य चौक, रस्ते आणि उड्डाणपूल रंगविण्यासाठी पालिकेने सुरुवात केली आहे. त्यासाठी १ कोटी २० लाखांची निविदा काढण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर शहर सुंदर आणि स्वच्छ बनविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. शहराचे सौंदर्यीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केले जात आहे. या अंतर्गत  मुख्य चौक, रस्ते आणि उड्डाणपूलांना रंगावण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.याकरिता विविध स्वरूपाच्या संस्थेची मदत घेऊन अनेक ठिकाणी रंग काम करण्यात आले आहे.

लवकरच आरंभ

मात्र तरीदेखील शहरातील अनेक भागाची रंगरंगोटी करणे अदयापही शिल्लक राहिले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेने नुकतीच १ कोटी २० लाखाची निविदा प्रसिद्ध केली आहे.त्यानुसार येत्या काही दिवसांत या कामास सुरुवात केली जाईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे.

Story img Loader