वसई- नालासोपारा शहरातील लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज, आचोळे, पेल्हार या प्रत्येक पोलीस ठाण्यात वर्षाला सरासरी एक हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद होत असते. त्यातही संतोषभवन परिसर गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनला आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘संतोष भवन’ परिसरात नवीन पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांना पाठवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात १९ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यातील सर्वाधिक गुन्हे हे नालासोपारा पूर्वेला होत असतात. नालासोपार्‍यातील संतोष भवन, बिलाल पाडा, पेल्हार, नगीनदास पाडा, प्रगती नगर आदी परिसरात लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्याचे विभाजन करून पेल्हार आणि आचोळे अशी दोन पोलीस ठाणी तयार करण्यात आली होती. परंतु गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालेले नाही. चालू वर्षातील ११ महिन्यात नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार पोलीस ठाण्यात ९७१ आचोळ्यात ५५० तर तुळींज पोलीस ठाण्यात ८९० गंभीर गुन्ह्यांची नोद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये त्यात अमली पदार्थ, हत्या, अपहरण, प्राणघातक जबरी चोरी, बलात्कार, विनयभंग, दंगल आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हे वाढते गुन्हे पोलिसांची डोकेदुखी बनली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन येथे याच नावाने नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – शहरबात… कौल दिलाय मग सुनावणी का?

नालासोपारा हे शहर सर्वाधिक गर्दीचे आणि वाढत्या लोकसंख्येचे आहे. अनधिकृत बांधकामांमुळे नवनवीन वसाहती तयार होत असून परप्रांतियांचा मोठी लोकसंख्या वाढत आहे. सर्वाधिक गुन्हे याच परिसरात घडत आहेत. त्यामुळे या भागातील गुन्हेगारी कमी करून कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी नवीन पोलीस ठाण्याची गरज वाटू लागली. यासाठी महासंचालकांना तसा प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली.

हेही वाचा – भरधाव दुचाकीच्या धडकेत १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

खारीगाव पोलीस ठाणे रद्द करणार

नालासोपार्‍यात नवीन पोलीस ठाणे तयार करण्यासाठी मिरा रोडमधील प्रस्तावित खारीगाव पोलीस ठाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खारीगाव ऐवजी संतोषभवन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मंजुरी आणि इतर तांत्रिक गोष्टींची अडचण येणार नसल्याचे पोलीस आयुक्त मुधकर पांडे यांनी सांगितले. काशिमिरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून काशिगाव पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे याच परिसरात खारीगाव या पोलीस ठाण्याची तशी गरज नसल्याचेही पांडे यांनी स्पष्ट केले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New police station will be built in santosh bhawan in nalasopara ssb