वसई– विरार स्थानकाच्या पश्चिमेकडे असलेल्या गर्दी आणि अडथळ्यातून बाहेर पडणे आता सोयीचे झाले आहे. पश्चिम रेल्वेने विरारच्या फलाट क्रमांक २ मधून बाहेर जाण्यासाठी रस्ता तयार करून दिला आहे. फलाटाला लागून असलेल्या ठाकूर आर्केडच्या खासगी जागेतून हा रस्ता काढला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विरार रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून बाहेर पडणे प्रवाशांसाठी मोठे दिव्य असतं. पश्चिमेला मुळात रस्ता अरुंद आहे. त्यात फेरिवाल्यांचे अतिक्रमण आणि रिक्षाचालकांनी जागा व्यापलेली असते. त्यामुळे स्थानकातून बाहेर पडताना प्रवाशांन मोठी कसरत करावी लागते. त्यातच विरार स्थानकाच्या पुनर्निमाणाचे काम सुरू आहे. यामुळे फलाटावरून पश्चिमेकडे बाहेर निघण्यासाठी प्रवाशांना खूप अडचणी सहन कराव्या लागतात आणि त्यात वेळ जाते. गर्दीच्या वेळी धक्काबुक्की होते असते. महिला प्रवासी त्यात भरडले जातात. यासाठी पश्चिम रेल्वेने फलाट क्रमांक २ मधून बाहेर जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. फलाट क्रमांक २ ला लागून ठाकूर आर्केड हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. रेल्वेने त्यांच्या मालकाशी संपर्क करून रस्ता देण्याची विनंती केली होती. त्यामुळे सामाजिक हित लक्षात घेऊन त्यांनी आपली जागा दिली आहे.
हेही वाचा >>>वसईत आरटीई प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
सध्या या ठिकाणी फलक लावण्यात आले असून दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. ते प्रवाशांना या नवीन रस्त्यावरून बाहेर जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय सतत उद्घघोषणा करून प्रवाशांना या रस्त्याने बाहेर जाण्याबाबत सांगण्यात येत आहे. या रस्त्यामुळे फलाट क्रमांक २ मधून बाहेर पडल्यावर ठाकूर आर्केडमधून थेट विवा होम्सच्या दारातून बाहेर पडता येत आहे. सध्या प्रवाशांना या रस्त्याबाबत फारसी माहिती नाही. मात्र हा रस्ता फारच दिलासादायक आहे. यामुळे गर्दी आणि वाहतूक कोंडीतून बाहेर पडतो असे केवल वर्तक या प्रवाशाने सांगितले.
श्रेया हॉटेलजवळील रस्ता ठरला उपयुक्त
विरार पश्चिमेला रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या मुख्य रस्त्यावर रिक्षांसह इतर वाहनांची गर्दी असते. त्यामुळे येथून ये जा करताना नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मुख्य रस्ता हा केवळ एकच मार्ग असल्याने याआधी विठ्ठल मंदिर रोड आणि डोंगरपाडा रस्ता असा प्रवास करावा लागत होता. त्यासाठी पालिकेने खासगी जागा मालकांशी चर्चा करून ७ मीटर इतका रस्ता संपादन केला आणि श्रेया हॉटेल जवळून ते जैन मंदिरा जवळ जाण्यासाठी एक मार्गिका रस्ता सुरू केला आहे. त्यामुळे विरार पश्चिमेच्या भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन वाहन चालकांना ही अगदी जवळचा रस्ता उपलब्ध झाला आहे. यामुळे वेळ व इंधन या दोन्हीची बचत होऊन वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे.