वसई : वसई-विरार शहरात प्राण्यांसाठी दफनभूमी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरात मरण पावलेले प्राणी हे पालिकेच्या कचराभूमीत दफन केले जात आहेत. त्यामुळे कचराभूमी परिसरातील आरोग्याच्या समस्येत भर पडली आहे.

वसई-विरार शहराची स्थापना २००९ साली झाली. त्यापूर्वी शहरात ४ नगर परिषदा होत्या. मात्र, आजवर प्राण्यांसाठी एकही दफनभूमी तयार करण्यात आलेली नाही. शहरात दररोज किमान १० ते १२ विविध प्रकारच्या प्राण्यांचा मृत्यू होत असतो. त्यामुळे रस्त्यावर फिरणारे गाई, म्हशी, श्वान, मांजरी आदींचा समावेश आहे. महामार्गावरील अपघातातही प्राणी दगावतात. त्यांची पालिकेतर्फे विल्हेवाट लावण्यात येते.

नियमानुसार दफनभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात; परंतु पालिकेकडे प्राण्याची एकही दफनभूमी नसल्याने हे प्राणी गोखिवरे येथील कचराभूमीत नेले जातात आणि तेथे त्यांचे दफन केले जाते. मात्र, मुळात तेथे जागा अपुरी असून कचऱ्याचे डोंगर आहेत. त्यामुळे मयत प्राणी योग्य रीतीने दफन केले जात नाही किंवा अनेकदा कचऱ्यात फेकले जात असल्याचे आढळले आहे. यामुळे प्रचंड दुर्गंधी आणि रोगराई पसरत असते. त्यामुळे प्राण्यांसाठी दफनभूमी तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोंडवाडेही नाहीत

पालिकेने भटकी श्वाने आणि इतर जनावरांसाठी कोंडवाडे तयार करम्ण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मंजूर केला होता. त्यानुसार भटकी श्वाने आणि जनावरे या कोंडवाडय़ात ठेवली जाणार होती. मात्र कोंडवाडे तयार करणे, तेथे प्राणी ठेवणे ही किचकट प्रक्रिया असल्याने अद्याप पालिकेने ते उभारलेले नाही. शहरात भटक्या श्वानांची संख्या १ लाखांहून अधिक आहे. निर्बीजीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू असून श्वानांची संख्या वाढत आहे.

जनावरांसाठी दफनभूमी असणे आवश्यक आहे. याबाबत सक्ती नसली तरी पालिकेने शहरात जनावरांसाठी दफनभूमी तयार करावी. यामुळे पशुपालकांना आपली जनावरे मेल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता येतील. डॉ. प्रशांत कांबळे, आयुक्त, पालघर जिल्हा पशुसंवर्धन

Story img Loader