वसई : वसई-विरार आणि मिरा भाईंदर शहरातील सर्व मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाचे पालन करत बुधवार सकाळपासून पहाटेची अजान भोंग्यावरून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेने धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरविण्याची मागणी केल्यानंतर कुणीही भोंगे उतरवले नाहीत मात्र शहरातील २६९ पैकी १३४ मशिदी आणि मदरशांनी भोंगे लावण्याची परवानगी मागितली. या मशिदींनी सकाळची अजान भोंग्याशिवाय तर दिवसभरातील सर्व अजान आवाजाची मर्यादा पालन करून केली. त्यामुळे शहरात दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात एकूण ७४ मशिदी आणि १९५ मदरशे आहेत. मनसेने मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केल्यानंतर वातावरण पेटू लागले होते. मात्र मशिदींनी भोंगे न काढता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याचे ठरवले. त्यामुळे मशिदींनी भोंगे न काढता परवागनी घेऊन लावण्याचा निर्णय घेतला. वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरात २६९ पैकी १३४ मशिदी आणि मदरशांनी भोंगे लावण्याची परवानगी मागितली. उर्वरित १३५ मशिदी आणि मदरशांनी बुधवारी भोंग्याशिवाय अजान सादर केली. या मशिदींनी देखील रीतसर परनवानी घेऊनच भोंग्यावर अजान म्हटली जाईल, असे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत भोंग्यांचा वापर न करण्याचे आदेश दिले आहेत. पहिली अजान पहाटे ५ वाजता होते. त्यामुळे सर्व मशिदी आणि मदरशांनी पहाटेची अजान भोंग्याशिवाय करण्याचा निर्णय घेतला आणि बुधवारी प्रथमच भोंग्याशिवाय अजान झाली. दिवसभरात झालेल्या इतर अजान या परवानगी घेतलेल्या भोंग्यावर आणि आवाजाच्या मर्यादेत झाल्या, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक (जनसंपर्क) पालकर यांनी दिली. आम्ही सर्व मशिदींना आवाहन केले होते. समाजात तेढ वाढू नये, शांतता नांदावी यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील नमाज पठणदेखील बंद केले आहे, अशी माहिती माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी दिली.
नालासोपाऱ्यात हनुमान चालिसा
मनसेतर्फे दिवसभरात कुठल्याही मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यात आला नव्हता. मात्र संध्याकाळी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरती करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मंदिरांनीही भोंग्यासाठी परवानगी मागितली
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व धार्मिक स्थळांसाठी असल्याने मशिदींपाठोपाठ मंदिरांनाही भोंग्यासाठी परवानगी आवश्यक झाली आहे. आयुक्तालयात ७२२ मंदिरे आहेत. त्यांनीदेखील परवानगी मागणारे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. बुधवार संध्याकाळपर्यंत १२ मंदिरांना भोंग्याची परवानगी देण्यात आली होती.
पोलीस यंत्रणा सतर्क
भोंगे वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी धार्मिक स्थळप्रमुख आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या होता. रात्री आणि पहाटेच्या गस्ती वाढवल्या होत्या. बुधवारी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. कुठल्याही मशिदीसमोर कुणीही हनुमान चालीसा म्हटले नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयकांत सागर (मुख्यालय) यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी १०० जणांना कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवल्या होत्या. त्यात मनसेचे ५३ पदाधिकारी आणि तर ४७ जणांचा समावेश होता.

Story img Loader