वसई – विरार पोलिसांनी उघडकीस आणलेल्या इमारत घोटाळ्यातील अनधिकृत इमारतींची संख्या ५५ वरून ११७ झाली आहे. तपासामध्ये ६२ आणखी अनधिकृत इमारती बांधल्याचे समोर आले आहे. वसई विरारमधील विविध पोलीस ठाण्यात या ११७ इमारतींप्रकरणात शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ११७ इमारतींपैकी सिडको काळातील ३४ तर पालिकेच्या काळातील ८४ इमारतींचा समावेश आहे.
विरार पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती बांधल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. पोलिसांना आरोपींकडे ५५ अनधिकृत इमारतींच्या फाईल आढळल्या होत्या. मात्र आरोपी प्रशांत पाटील आणि दिलीप अडखळे यांच्या संगणाकातील हार्ड डिस्कमधून आणखी ६२ अनधिकृत इमारती बांधल्याची माहिती मिळाली. त्यामुळे एकूण अनधिकृत इमारतींची संख्या आता ५५ वरून ११७ झाली आहे. पोलिसांनी या सर्वांचा तपशील घेऊन प्रभागनिहाय गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली. प्रभाग समिती सी (चंदनसार), बी (नालासोपारा), डी (आचोळे), जी (वालीव) एच (नवघर माणिकपूर) आदींमध्ये या इमारती बांधण्यात आल्या होत्या. या इमारतींचा पंचनामा केल्यानंतर सर्वच्या सर्व ११७ इमारतींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात १०० हून अधिक आरोपी आहेत.
आम्ही सर्वच्या सर्व ११७ अनधिकृत इमारतींविरोधात पोलिसांना तक्रारी दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (अतिक्रमण) डॉ. किशोर गवस यांनी दिली.
हेही वाचा – नालासोपार्यात महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, अपघाताचा रचला होता बनाव
पालिकेने ज्या ज्या तक्रारी दिल्या त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केले आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. आरोपींची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे, अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.