वसई- गुन्हे शाखेने अटक केलेल्या हत्या आणि घरफोडी करणार्या एका कुख्यात टोळीतील सहा जणांविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रित अधिनियम १९९९ च्या कलमाअंतर्गत (मोक्का) गुन्हे दाखल कऱण्यात आले आहे. या मध्ये एका महिला आरोपीचाही समावेश आहे.
हत्या, हत्येसह दरोडा, जबरी जोरी आदी गंभीर गुन्हे करणार्या एका ६ जणांच्या कुख्यात टोळीला जानेवारी महिन्यात गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली होती. टोळीचा म्होरक्या मनिष उर्फ राजू मोहन चव्हाण, रवींद्रसिंग सोलंकी, भाऊसाहेब गवळी, सुखचेन पवार, मॉण्टी उर्फ नंदू चव्हाण तसेच अश्वीनी चव्हाण या महिला आरोपीचा समावेश होता. त्यांच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या टोळीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह मध्यप्रदेश, राजस्थान येथे देखील दहशत निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती. त्यानुसार या सर्वावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रित अधिनियम १९९९ च्या कलमाअंतर्गत (मोक्का) गुन्हे दाखल कऱण्यात आले आहे. संघटीत गुन्हेगारी करत या टोळीने दहशत माजवली होती. या नवीन गुन्ह्यांमुळे त्यांच्या कारवाईला आळा बसणार आहे, असा विश्वास गुन्हे शाखा ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>भाईंदर : मिरा भाईंदरच्या शिक्षण अधिकाऱ्यांना महापालिकेची नोटीस, मराठा कुणबी नोंदी शोधण्यास दिरंगाई केल्याचा ठपका
प्राणघातक हल्ला आणि हत्या करणारी खतरनाक टोळी
ही टोळी अत्यंत खतरनाक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरोडा घालताना कुणी प्रतिकार केला तर थेट प्राणघातक हल्ला आणि हत्या केली जाते. मनिष उर्फ राजू मोहन चव्हाण हा या टोळीचा म्होरक्या आहे.
२०१९ मघ्ये शहापूर येथे हॉटेल व्यावसायिक सुरेश मुनाजे यांची शहापूर येथील बंगल्यात दरोडा घालण्यात आला होता. त्यावेळी प्रतिकार करणार्या सुरेश मुनाजे याची निर्घृण हत्या कऱण्यात आली या प्रकरणीमनोज उर्फ राजू चव्हाण याला अटक केल्यानंतर तो तुरुंगात होता. सप्टेंबर २०२३ मध्ये तो जामिनावर सुटला होता. तेव्हापासून त्याने आपल्या टोळीची जुळवाजुळव करत पुन्हा दरोडे घालण्यास सुरवात केली होती. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत या टोळीने एकूण ५ दरोडे घातले होते.
जानेवारी महिन्यात ही टोळी विरार जवळच्या शिरसाड येथे पेट्रोलपंप लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा ३ चे पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र आरोपींनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, तसेच युवराज वाघमोडे, चेतन निंबाळकर, सचिन घेरे आणि अश्वीन पाटील हे पोलीस कर्मचारी जखमी झाले होते