व्यावसायिक इमारतीचे दर परवडत नसल्याने बंगल्याची निवड

वसई: शहरातील २ साहाय्यक  पोलीस आयुक्तांचे कार्यालय निवासी बंगल्यात सुरू झाले आहे. व्यावसायिक इमारतीचे दर परवडत नसल्याने बंगल्याची निवड करण्यात आली आहे. बंगल्याची प्रशस्त जागा, अंतर्गत सजावट यामुळे दोन्ही साहाय्यक आयुक्तांची कार्यालये ही देखणी आणि नागरिकांसाठी देखील सोयीची ठरली आहेत.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली. नव्या रचनेनुसार पोलीस आयुक्तालयाची विभागणी ३ परिमंडळात करण्यात आली. त्यापैकी मिरा भाईंदर शहर परिमंडळ १ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तर वसई विरार शहराची विभागणी परिमंडळ २ आणि ३ मध्ये करण्यात आली आहे. परिमंडळ २ आणि ३ मध्ये एकूण ३ सहाय्यक पोलीस आयुक्तांची (एसीपी) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू होता. बोळींज विभागाचे साहाय्यक पोलीस आयु्क्तांचे कार्यालय यापूर्वीच बोळींज येथील एका बंगल्यात सुरू करण्यात आले आहे. तर तुळींज विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांचे कार्यालय नुकतेच वसई पुर्वेच्या एव्हरशाईन येथील बंगल्यात सुरू करण्यात आले आहे. हा बंगला प्रशस्त असून बंगल्याची अंतर्गत सजावट सुंदर आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अभ्यागतांची सोय होणार आहे. शासकीय दरात व्यावासियक इमारतीत कार्यालय उभारणे शक्य नव्हते. त्यामुळे निवासी बंगल्यात कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती तुळींज विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांनी दिली. नवीन कार्यालय सर्व नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील आठवडय़ात आचोळे पोलीस ठाणे सुरू होणार

सध्या वसई विरार शहरात एकूण ७ पोलीस ठाणी आहेत. त्यात वसई, माणिकपूर, वालीव, तुळींज, नालासोपारा, विरार आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचा समावेश आहे. आयुक्तालयात बोळींज, मांडवी, नायगाव, पेल्हार आणि आचोळे ही ५ पोलीस ठाणी प्रस्तावित आहेत. त्यापैकी पेल्हार आणि आचोळे पोलीस ठाण्यांना प्राधान्याने मंजूरी देण्यात आली आहे. आचोळे पोलीस ठाण्याचे काम अंतिम टप्प्यात असून २१ ऑगस्ट रोजी त्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, लवकर ते सुरू होईल अशी माहिती प्रस्तावित आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली.

पोलीस ठाणे तुळींज साहाय्यक पोलीस आयुक्तालय

१) तुळींज

२) आचोळे

३) वालीव

बोळींज साहाय्यक पोलीस आयुक्तालय

१) बोळींज

२) अर्नाळा

३) नालासोपारा

Story img Loader