वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला मुहूर्त मिळला आहे. सोमवार पासून विरार जवळील खानिवडे येथून या कामाची सुरवात केली आहे. यात सुमारे १२१ किलोमीटर इतका रस्ता टप्याटप्याने काँक्रिटीकरण केला जाणार आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई, गुजरात यासह वसई विरार, पालघर, ठाणे, मीरा भाईंदर या शहरांना जोडणारा महत्वाचा महामार्ग गेला आहे. सद्यस्थितीत दळणवळणाच्या दृष्टीने विविध भागांना जोडणारा महामार्ग असल्याने या मार्गावर प्रचंड वाहनांची वर्दळ असते परंतु या महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष होत असल्याने मागील काही वर्षांपासून विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत यात विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांची मोठी समस्या असून येथून प्रवास करताना नागरिकांना खडतर प्रवास करावा लागतो.
तर खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना समोर येत असतात. सातत्याने निर्माण होत असलेल्या समस्येमुळे त्यावर कायमस्वरूपी व दीर्घकाळ टिकेल अशी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. महामार्गावर व्हाईट टॉपिंग करून १२१ किलोमीटर पर्यँतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ६०० कोटी रुपये निधी खर्च केला जाणार असून ३ भुयारी मार्ग पूल , १० पादचारी पुलांचा समावेश करण्यात आला आहे. या कामाची सुरुवात अवघ्या एका महिन्यात करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. मात्र महिना उलटून गेला तरी कामाला सुरवात झाली नव्हती. त्यामुळे मंत्र्यांची घोषणा पोकळ ठरल्या असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. याशिवाय या रस्त्याच्या कामाच्या होत असलेल्या दिरंगाई बद्दल दैनिक लोकसत्ताने सुद्धा वृत्त प्रसारित करून प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली हिती. अखेर शनिवारी रस्त्याच्या कामाची ट्रायल घेऊन सोमवार पासून प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा… वसई : नाताळ उत्सवासाठी बेकर्या, कॅफे सज्ज; आकर्षक सजावट, विविध पदार्थांची रेलचेल
विरार जवळील खानिवडे टोलनाका येथून सुरवात झाली आहे. यात खानिवडे टोल नाका ते चारोटी व खानिवडे ते वर्सोवा पूल असे या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण केले जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.
महामार्गाच्या व्हाईट टॉपिंग करण्याचे सोमवार पासून सुरू करण्यात आले आहे. टप्पा टप्प्याने सर्व नियोजन करून काम पूर्ण केले जाईल.- सुहास चिटणीस, प्रकल्प निर्देशक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
पर्यायी मार्गांचे नियोजन योग्य करा
महामार्गाचे टप्प्या टप्प्याने व्हाईट टॉपिंगचे काम केले जाणार आहे.यामुळे कामामुळे ये जा करण्यासाठी महामार्गावर पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. सद्यस्थितीत महामार्गावरील वाहनांची वर्दळ अधिक असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते यासाठी पर्यायी व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पादचारी पुलाचेही काम सुरू
महामार्ग प्राधिकरणा तर्फे वर्सोवा पुलापासून ते पालघरच्या अच्छाड पर्यँत दहा ठिकाणी पादचारी पूल तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यात विरार बावखळ टोकरेपाडा, वंगणपाडा नालासोपारा, शिवेचापाडा, कोल्ही चिंचोटी, ससूपाडा अच्छाड,जव्हार फाटा, दुर्वेस व अन्य दोन ठिकाणे यांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ६९ कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. हे पूल मुख्य रस्त्यापासून साडेपाच मीटर उंचीवर असणार आहेत. या कामाची सुरुवात विरार बावखल येथून करण्यात आली आहे.
नागरिकांना दिलासा मिळणार
महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत होता. याशिवाय काही वेळा खड्ड्यामुळे अपघात, वाहतुक कोंडी अशा समस्या निर्माण होत असतात. रस्ते व्हाईट टॉपिंग झाल्यास प्रवास करताना होणाऱ्या अडचणी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.