वसई : तीन आठवडय़ांपूर्वी नायगाव उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याचे मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र अजूनही नागरिकांना पूल खुला होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
नायगाव पूर्व व पश्चिम भागाला जोडण्यासाठी उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम तीन आठवडय़ांपूर्वी पूर्ण झाले आहे.
या पुलामुळे मुंबई ते वसई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वसई, नायगाव पूर्व, नायगाव पश्चिम, उमेळे, जूचंद्र परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता पूर्व-पश्चिम भागांत जाण्यासाठी, तसेच राष्ट्रीय महामार्गावर येण्यासाठी प्रवासी, वाहनचालकांना १२ ते १५ कि.मी.चा वळसा घालावा लागणार नाही.
याशिवाय वेळ व इंधन या दोन्हीची बचत होणार आहे. नायगाव उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला असला तरी अजूनही अधिकृतरित्या खुला झालेला नाही. कधी हा पूल खुला केला असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे या पुलाच्या नामांतराचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्यामार्फत विविध नेत्यांच्या नावाची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे नायगाव उड्डाणपूल खुला होण्याआधीच वसईत श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचा विकास नाहीच
एकीकडे पूल बांधून पूर्ण झाला आहे असे असताना या भागाला जोडणारे मुख्य रस्ते अजूनही अनेक ठिकाणच्या भागात निमुळते आहेत. तसेच नायगाव पूर्व-पश्चिम अशा दोन्ही ठिकाणच्या भागात रस्त्याच्या कडेला अनेक वाहने उभी असतात तर दुसरीकडे काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. त्यामुळे पूल खुला झाल्यास विविध ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी या पुलाला जोडणारे मुख्य रस्तेही विकसित करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना
नायगाव उड्डाणपूल पूर्ण होऊन काही दिवस उलटून गेले तरीही या पुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळला नाही. या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास मनसेचे नेते अविनाश जाधव व कार्यकर्ते स्वत: पुलाचे उद्घाटन करून हा पूल खुला करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलीस प्रशासन व अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन थांबविण्यात आले. येत्या १ मे पर्यंत हा पूल खुला झाला नाही तर मनसे स्वत: उद्घाटन करून हा पूल खुला करेल असा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. तसेच हा पूल खुला करताना पूर्व-पश्चिम अशा दोन्ही भागांतील रस्ते रुंदीकरण करा जेणेकरून तेथील स्थानिकांना याचा त्रास होणार नाही याचीही काळजी प्रशासनाने घ्यायला हवी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा