वसई: नालासोपाऱ्यात बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. मंगळवारी संध्याकाळी नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथे ही दुर्घटना घडली. नालासोपारा पूर्वेला मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चौधरी कंपाऊंड येथे एक बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली. ही भिंत सुमारे २० फूट उंच होती. या दुर्घटनेत ५ मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

हेही वाचा >>> जुना अंबाडी रेल्वे पूल निष्कासित होणार; पुलावरील वाहतूक सोमवार पासून बंद

पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगारा उपसून या जखमी मजुरांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत दहरथ लहाडा (३०) या मजुराचा मृत्यू झाला आहे. तर शैलेश शिंगाडा (१९) रामू मागे (२५) कल्पेश नगडे (१९) भरत दुमडा (२०) हे चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली. या ठिकाणी गोदामाचे बांधकाम सुरू होते. पालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. आमचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचून मदतकार्य करत आहेत तसेच माहिती घेत आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे मनाळे यांनी सांगितले.

Story img Loader