सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : २०२२ या वर्षांत वसई, विरार शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या एकूण एक लाख ४५ हजार ९२७ प्रकरणांची नोंद झाली आहे. तीन कोटी ९९ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये वसई विभागाची दंडाची वसुली ७९ टक्के तर विरार विभागाची दंडाच्या वसुलीची टक्केवारी ही ४४ टक्के आहे.

शहरात विरार आणि वसई असे दोन वाहतूक विभाग आहेत. या विभागांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. २०२२ या वर्षांत वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची एक लाख ४५ हजार प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, नंबर प्लेट न लावणे किंवा चुकीच्या नंबर प्लेट लावणे, चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे अशा विविध नियमांचा समावेश आहे.

विरार विभागात सर्वाधिक म्हणजे ८२ हजार प्रकरणांची तर वसई विभागात ६२ हजार ८४४ प्रकऱणांची नोंद झाली. वसई आणि विरार विभागांनी एकूण ३ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. वसईतून २ कोटी ४३ लाख ७७ हजार तर विरार विभागातून एक कोटी ५६ लाख ९०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. वसई विभागाची दंडाच्या वसुलीची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ७९ टक्के आहे. विरार विभागातून ४४ टक्के वसुली झाली आहे. 

वाहतुकीचे नियोजन करणे, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच दंडाच्या वसुलीचे मोठे आव्हान आमच्यापुढे होते. २०२२ या वर्षांत आम्ही दंडवसुलीवर भर दिला होता. त्यामुळे यंदा आमच्या विभागात दंडाची वसुली ही मागील वर्षांच्या तुलनेत जास्त म्हणजे ७९ टक्के एवढी झाली आहे. ती अधिक वाढविण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी दिली.

आम्ही वर्षभर विविध मोहिमा राबवून वाहनचालकांमध्ये जनजागृती करत असतो.

याशिवाय कारवाया करण्यासाठी नाकाबंदी तसेच विशेष मोहीम आखत असतो. कारवाईमुळे बेशिस्त तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आळा बसेल असा विश्वास विरार वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी व्यक्त केला.

वसई विभाग

* एकूण प्रकऱणे- ६२ हजार ८४४

* एकूण दंड-   ३ कोटी ४१ लाख ५२ हजार ५०

* भरलेल्या दंडाची प्रकरणे-  ४९ हजार ९२५

* भरलेल्या दंडाची रक्कम-  २ कोटी ४३ लाख ७७ हजार

* न भरलेल्या दंडाची प्रकरणे-  १२ हजार ९१९

* न भरलेल्या दंडाची रक्कम- ९७ लाख ७५ हजार ३००

* दंड भरल्याची रक्कम-  ७९.४४ टक्के

विरार विभाग

* एकूण प्रकरणे- ८३ हजार ८३

* एकूण दंड- २ कोटी ६२ लाख ४७ हजार ५०

* भरलेल्या दंडाची प्रकरणे- ३६ हजार ४६४

* भरलेला दंड – १ कोटी ५६ लाख २ हजार ९००

* न भरलेल्या दंडाची प्रकरणे- ४६ हजार ६१८

* न भरलेल्या दंडाची रक्कम- १ कोटी ५६ लाख ८४ हजार १५०

* दंड भरलेली रक्कम- ४४ टक्के

प्रमुख नियमांचे उल्लंघन

५८१    विना हेल्मेट

१९४    मद्यप्राशन करून वाहन चालवणे

११०००  सीट बेल्ट न लावणे

१०४१   विनापरवाना

२८१०   सिग्नल

१५६५   नंबर प्लेट

Story img Loader