वसई : घोडबंदर येथील वर्सोवा खाडीवर बांधण्यात आलेल्या नव्या वर्सोवा पुलाची मुंबई आणि ठाण्यावरून सुरतच्या दिशेने जाणारी एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात ट्वीट करून पुल सुरू करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर अवघ्या ३ तासांत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे जुन्या वर्सोवा पुलाच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई तसेच ठाण्याहून पालघर आणि गुजरातला जाण्यासाठी घोडंबदर येथील वर्सोवा खाडी पार करावी लागते. या खाडीवर पहिला पूल १९६८ मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल कमकुवत झाल्याने जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू करण्यात आले होते. हा पूल ४ मार्गिकेचा असून जानेवारी २०१८ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असले तरी उद्घाटनाचा २० फेब्रुवारीचा मुहूर्त लांबणीवर पडला होता. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हा पूल लवकरच सुरू करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली आणि संध्याकाळी ७ वाजता पुलाची एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जाहीर करण्यात आले.

कोंडीपासून सुटका?

या पुलाची सुरतच्या दिशेने जाणारी मार्गिका खुली झाल्याने दररोज जुन्या पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाच्या आत मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका पूर्ण केली जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक मुंकुद अत्तरदे यांनी सांगितले.

Story img Loader