भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील राई मुर्धे गावात उभारण्यात येणाऱ्या ८७ एकरमधील कारशेड व मेट्रोच्या भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर यामुळे मेट्रो कारशेड निर्मितीचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून दहिसर- मीरा भाईंदर मेट्रो मार्ग ९ या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. दहिसर चेकनाक्यावरून मेट्रो सरळ काशिमीरा नाक्यापर्यंत येणार असून नंतर ती थेट गोल्डन नेस्ट सर्कलपर्यंत जाणार आहे. या ठिकाणी डावीकडे उड्डाणपुलाजवळून ती भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदान जवळ नेली जाणार आहे. यात एमएमआरडीने यासाठी आठ ठिकाणी स्थानके उभारण्याच्या जागा निश्चित केल्या होत्या.त्याचप्रकारे मेट्रोच्या कामालादेखील सुरुवात करण्यात आली होती. मात्र मेट्रो कारशेडसाठी राई – मुर्धे येथील ८७ एकर जागा निश्चित असल्यामुळे एक स्थानकाची वाढ करत राई गावापर्यंत मेट्रो घेऊन जाण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आला होता. यापूर्वी हा मेट्रो मार्ग सुभाषचंद्र बोस मैदाना बाजूकडील मिठा घराच्या जागेतून नेण्यात येणार होता. मात्र याचा कोणताही नागरिकाला फायदा होणार नसल्याने तो मार्ग मुख्य मार्गावरून घेऊन जाण्याचे ठरवण्यात आले. हा पर्यायी मार्ग उत्तन येथील मुख्य मार्ग असल्याने तो साधारण १०० फुटांपर्यंत मोकळा करणे आवश्यक आहे.

सध्या या मार्गावर केवळ ३० फुटांपर्यंत रस्ता मोकळा असून दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणात गावकऱ्यांची घरे आहे. त्यामुळे हा रस्ता मोकळा करून घरे स्थलांतरित करण्याकरिता व बाधित रक्कम देण्याकरिता मेट्रोकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र मेट्रोच्या मार्गामुळे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून संपूर्ण गाव नष्ट होण्याच्या धोका असल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते शासनाने कोणताही पूर्व अभ्यास न करता शेतजमिनीत तसेच मुख्य गावातून ही मेट्रो नेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय जमिनींचे भूसंपादन केल्यास संपूर्ण गाव नष्ट होऊन ग्रामस्थांचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने कारशेडकरिता पर्यायी जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी कारशेड उभारावे अशी मागणी होऊ लागली आहे. तसेच याकरिता होत असलेले सर्वेक्षणदेखील थांबवण्यात आले असून तोडगा निघेपर्यंत काम बंद ठेवणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

आज संयुक्त बैठकीचे आयोजन

दहिसर मीरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामाकरिता राई-मुर्धे येथील ८७ एकर जागेत कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मेट्रो निर्मितीत बाधित होणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्याकरिता एमएमआरडीच्या विभागाकडून सर्वेक्षण पार पाडण्यात येत आहे.मात्र या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्यामुळे काम हे ठप्प झाले आहे. यात कारशेड जागावर सातबाऱ्यानुसार ७५ जमीन मालक व मेट्रो मार्गावरील ४५७ घरे बाधित होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्याकरिता तसेच यावर योग्य तोडगा काढण्याकरिता येत्या शनिवारी राई येथे ग्रामस्थ व एमएमआरडीए विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील यांनी दिली.