वसई- दिवाणमान येथे प्रस्तावित केलेल्या नवघर माणिकपूरच्या सांडपाणी प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. हा प्रस्ताव  केवळ सामाजिक नाही, तर पर्यावरणीय व तांत्रिकदृष्ट्याही चुकीचा आहे. समाजाच्या आरोग्य व पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा प्रस्तावित प्रकल्प येथून हलविण्याती मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. वसई विरार महापालिकेने नवघर माणिकपूर शहराचा सांडपाणी प्रकल्प दिवाणमान येथील शंभर फुटी रस्त्यावर प्रस्तावित केला आहे. त्यासाठी येथील महापालिकेचे वाहनतळ तसेच पाणी योजनचे तोलण तलाव (एमबीआर)चे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. भरवस्तती मध्ये हा सांडपाणी प्रकल्प येणार असल्याने येथील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसेचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी आयुक्तांना निवेदन दिवाणमान येथील  प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.

प्रस्तावित जागेच्या आजूबाजूला दाट वस्तीच्या वसाहती वसलेल्या आहेत. या सांडपाणी प्रकल्पातून  दुर्गंधी आणि विषारी वायू सतत उत्सर्जित होतात. यामुळे विविध आजार उद्भविण्याचा धोका आहे. भूवैज्ञानिक दृष्टिकोनातून ही अत्यंत असुरक्षित जागा आहे. मलनिस्सारण केंद्र उभारले गेले, तर सांडपाण्यातील हानिकारक घटक अत्यंत वेगाने केवळ शेजारच्या परिसरातच नव्हे, तर संपूर्ण उप-प्रदेशातील भूगर्भजल स्रोत दूषित होतीत. दूरवरच्या विहिरी, बोरवेल्स व पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होण्याचा धोका आहे असे राजाराम मुळीक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.  प्रस्तावित जागा वारंवार पावसाळ्यात पाण्याखाली जाते. त्यामुळे एसटीपी मधील सांडपाणी परिसरात पसरून आरोग्यसंकट निर्माण करेल शिवाय सिस्टम बिघडल्यास दूषित पाणी रस्त्यावर, घरांमध्ये किंवा  नाल्यांतून पसरू शकते, असे स्थानिक रहिवाशी शंकर बन यांनी सांगितले. सांडपाणी प्रकल्प आवश्यक आहे पण तो नागरी वस्तीबाहेर असावा. दिवाणमान येथे प्रकल्प झाल्यास दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतील, असे शिवसेना (ठाकरे गट) माजी गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी सांगितले.

हरित क्षेत्र आणि जैवविविधतेचा ऱ्हास

हा परिसर विविध स्थलांतरित पक्ष्यांचे थांबे म्हणून प्रसिद्ध आहे. प्रकल्पामुळे परिसरातील नैसर्गिक हरित पट्टा, झाडं, व जैवविविधता नष्ट होईल. आसपासच्या झाडांना व वनस्पतींनाही घातक परिणाम भोगावे लागू शकतात. जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होईल आणि परिसरातील तापमान वाढेल. यामुळे जैवविविधतेचा गंभीर ऱ्हास, परिसंस्थेतील संतुलन बिघडणे, आणि स्थानिक पर्यटन संधींवर परिणाम होईल, अशी भीती स्थानिक नागरिक दिलीप डाबरे यांनी व्यक्त केली.  ही जागा भरवस्तीत आहेत त्यामुळे येथील सर्वसामान्यांचे राहणीमान विस्कळीत होईल, मलनिस्सारण केंद्र चुकीच्या ठिकाणी व त्याच्या आजूबाजूच्या भूगर्भ रचनेचा विचार न करता उभारल्यास, आसपासच्या लोकांच्या आरोग्यावर, भूगर्भातील पाण्यावर व संपूर्ण परिसंस्थेवर गंभीर परिणाम होईल असे स्थानिक दिलीप डाबरे यांनी सांगितले.