उपचारासाठी यंत्रणाच नाहीत
प्रसेनजीत इंगळे
विरार : वसई-विरार महानगर तुळींज येथील पालिकेच्या रुग्णालयात अस्थिरोग चिकित्सा विभाग स्थापनेपासून सक्षम यंत्रणा नसल्याने मागील सहा वर्षांत या रुग्णालयात केवळ ३४४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अनेक वेळा मागणी करूनही या विभागात आवश्यकतेनुसार साहित्य आणि मनुष्यबळ वाढण्यात आले नसल्याने अस्थिरोगावर उपचार करणारा विभागाच अपंग असल्याचे दिसत आहे.
वसई-विरार महानगरपालिकेने सन २०१४ रोजी नालासोपारा तुळींज परिसरात महापालिकेने रुग्णालय निर्माण केले. नागरिकांना मोफत उपचार दिले जात असल्याचा दावा पालिका करत आहे; पण रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची मोठी परवड होत आहे. या रुग्णालयात असलेल्या अस्थिरोग चिकित्सा विभाग या विभागात सध्या दर सहा महिन्यांच्या ठेक्यावर ३ डॉक्टर कार्यरत आहेत; पण इतर सुविधा नसल्याने या विभागात शस्त्रक्रिया होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात डॉक्टरांना सहकार्य करणाऱ्या मदतनीसांचीसुद्धा वानवा आहे. यामुळे डॉक्टर आपल्या जोडीला आपले मदतनीस घेऊन येत आहेत. इतकेच नाही तर प्लास्टर करण्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा पुरेशा प्रमाणात नसल्याने रुग्णांना बाहेरून विकत आणावे लागत आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, त्याच बायपोलर ( खुब्याची शस्त्रक्रिया), प्लेटिंग, डीब्राईडमेंट अशा शस्त्रक्रिया सध्या केल्या जात आहेत; परंतु सी-आर्म नसल्याने मोठय़ा महागडय़ा शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. मागील सात वर्षांपासून येथे याची मागणी केली जात आहे. केवळ सी-आर्म उपलब्ध केल्यास लाखो रुपयांत होणाऱ्या शस्त्रक्रिया अगदी माफक दरात पार पडतील आणि नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. तसेच या रुग्णालयात असलेली क्ष किरण मशीन सातत्याने नादुरुस्त असते. यामुळे रुग्णांना एक्सरे बाहेरून काढून आणावे लागत आहेत.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सन २०१६ ते सन २०२१ मध्ये केवळ ३४४ अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. याचा अर्थ सरासरी केवळ ४० ते ५० शस्त्रक्रिया वर्षांला पार पडत आहेत. डॉक्टरांकडून दिलेल्या माहितीनुसार दिवसाला ७० ते ८० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यात अस्थिभंगाचे रुग्ण अधिक असतात; पण यातही सी-आर्मची गरज लागल्यास या शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. मुंबईला पाठविल्या जात आहेत. तर अस्थिभंग चिकित्सासाठी लागणारे साहित्यसुद्धा रुग्णालयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे येथील सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. वसई-विरार महानगरपालिका मोफत उपचार करत असल्याचे दावे करते; पण मुळात यंत्रणाच उभ्या केल्या नसल्याने केवळ चाचण्या होत असून उपचारासाठी लागणारे साहित्य आणि औषधे मात्र बाहेरून घ्यावी लागत आहेत. यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात महागडे उपचार करावे लागत आहेत.