सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता
वसई : करोना रुग्णांना आवश्यकतेनुसार तातडीने प्राणवायू उपलब्ध व्हावा, यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात उभारण्यात आलेले प्राणवायू निर्मिती प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून वापराविना पडून आहेत. हे प्रकल्प सुस्थितीत ठेवण्यासाठी पालिकांकडून देखभाल केली जात असली तरी, प्राणवायूला मागणी नसल्यामुळे या प्रकल्पांचे करायचे काय, असा प्रश्न महापालिका प्रशासनांसमोर आहे.
करोनाच्या काळात प्राणवायूची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने सर्व महापालिकांना प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकांनी रुग्णालय आणि तात्पुरत्या उभारलेल्या करोना केंद्रात प्राणवायू प्रकल्प उभारले होते. आता करोनाचे संकट ओसरल्याने प्राणवायूची तेवढी गरज लागत नाही. प्राणवायूची मागणी नसल्याने या प्रकल्पांचा वापर सध्या होत नाही आणि परिणामी हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या प्राणवायू प्रकल्पांचे करायचे काय? असा प्रश्न महापालिकांना पडला आहे.
हेही वाचा >>> वसई-विरारसाठी ‘सूर्या’चे १८५ दशलक्ष लिटर पाणी; ‘एमएमआरडीए’च्या निर्णयामुळे दिलासा
वसई विरार महापालिकेने चंदनसार, बोळींज, सोपारा या रुग्णालयांसह वसई वरुण इंडस्ट्री येथील करोना केंद्र अशा एकूण ४ ठिकाणी प्राणवायू प्रकल्प उभारले होते. मात्र मागणी नसल्याने सद्य:स्थितीत प्राणवायू प्रकल्प हे बंद अवस्थेत आहेत. मीरा भाईंदर महापालिकेने शहरात ६ ठिकाणी प्राणवायू प्रकल्प उभारले होते. त्यापैकी पंडित भीमसेन जोशी आणि इंदिरा गांधी रुग्णालयांतील प्राणवायू प्रकल्पांचा वापर सुरू आहे, तर प्रमोद महाजन सभागृह, मीनाताई ठाकरे सभागृह, अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह आणि कम्युनिटी हॉल या ४ ठिकाणी असलेल्या करोना केंद्रांत उभारलेले प्राणवायू प्रकल्प बंद आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेने रुक्मिणी बाई रुग्णालय आणि विभा कंपनी येथील करोना केंद्रात २ प्राणवायू प्रकल्प उभारले होते. मात्र ते दोन्ही सध्या बंद अवस्थेत आहेत. नवी मुंबई महापालिकेने सिडको प्रदर्शनी येथील करोना केंद्रासह वाशी नेरूळ आणि ऐरोली रुग्णालयात प्राणवायू प्रकल्प सुरू केले होते. हे प्राणवायू प्रकल्प सुरू असले तरी वापरात नसल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांनी दिली.
मुंबईतील प्राणवायू प्रकल्प सुरळीत
मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आलेले सर्व प्राणवायू प्रकल्प सुरळीत सुरू आहेत. कुपर रुग्णालयात ३, नायर रुग्णालयामध्ये २, लोकमान्य टिळक (शीव) रुग्णालयात २, सेंट जॉर्ज रुग्णालयात आणि किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात १ प्राणवायू प्रकल्प सुरू आहे. या सर्व प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले असून ते सुरळीत सुरू आहेत.
वसई विरार महापालिकेचे शासनाला साकडे
वसई विरार महापालिकेने शहरातली प्राणवायू प्रकल्प सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी खासगी यासाठी स्वारस्य अभिरुची तत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा काढली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्या प्रकल्पाच्या पुढील हालचालीच्या कामासाठी अग्निशमन विभाग यासह इतर परवानग्या आवश्यक आहेत. प्राणवायू प्रकल्पाचा पुढे कसा वापर करता येईल किंवा ते कसे सुरू ठेवता येतील यासाठी राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागितले आहे, अशी माहिती वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी दिली
ठाण्यातील एक प्रकल्प स्थलांतरित
ठाणे महापालिकेने २ प्राणवायू प्रकल्प उभारले होते. त्यापैकी १ व्होटास केंद्रात आणि दुसरे ग्लोबल रुग्णालय केंद्रात होते. आता प्राणवायू प्रकल्पाचा वापर होत नसल्याने व्होल्टास केंद्रातील प्रकल्प कळवा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला आहे.