पूरस्थितीमुळे वसईतील ग्रामीण भागांत शेतकरी चिंताग्रस्त

वसई: वसई पूर्वेतील ग्रामीण भागात गुरुवारी तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा येथील भातशेतीलाही बसला आहे. पुराचे पाणी भात लागवड केलेल्या शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून  राहिल्याने रोपे कुजून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पूर्वेतील ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात भातशेतीची लागवड केली जाते. परंतु या भागातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षांंपासून एकापाठोपाठ एक अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. नुकताच तानसा नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी खानिवडे, भाताने, नवसई, पारोळ यासह इतर तानसा नदी किनारी असलेल्या शेती शिवारात घुसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आवणीची कामेही हाती घेतली होती. मात्र पूरस्थितीमुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून या आवणीची कामेही ठप्प झाली असून खणून ठेवलेली भात रोपांचे मूठ पिवळे पडू लागले आहेत तर काहींचे शेतबांधावरील मूठ ही वाहून गेले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तर यासह मागील तीन दिवसांपासून लागवड झालेली शेती पाण्याखाली राहिल्याने पिके कुजून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच मजूर मिळत नाही आणि मिळाले तर पूरस्थिती यामुळे शेतीची कामे उरकण्यास अडचणी येत आहेत.

सतत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे व गुरुवारी आलेल्या महापुरामुळे भातशेती पाण्याखाली जाऊन भातपिकाला फटका बसला आहे. हजारो रुपये खर्च करून पूर्ण होत आलेली भात लागवड महापुरामुळे नुकसानीच्या गर्तेत सापडली आहे.

सुरेश घरत, शेतकरी, शिरवली

सध्या शेतमजूर मिळत नाहीत. जे मजूर मिळाले होते त्यांना जास्त मजुरी देऊन आवण खणून घेतले आहे, तर लागवडीच्या शेतात ट्रॅक्टर भाडय़ाने घेऊन चिखलणीही केली आहे. मात्र पाऊस थांबत नसल्याने आवणी उरकण्यास केलेला आटापिटा, मजुरीचा खर्च व खणलेले आवण हे सर्व वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

– भगवान किणी, शेतकरी

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy cultivation under water ssh 93
Show comments