वसई : वसईतील एका मेंदूमृत (ब्रेन डेड) महिलेच्या अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वसईत यशस्वी झाली असून त्यामुळे ६ जणांना नवसंजीवनी आहे. या महिलेच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर प्रत्योरोपित कऱण्यात आल्या आहेत. त्वचा बर्न सेंटर आणि डोळ्यांचे दोन कॉर्निया सुरक्षितपणे सहियारा आय बँकेत सुपूर्द करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील रिध्दी विनायक रुग्णालय हे अवयव प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे.
वसई राहणारी एक ५० वर्षीय महिला घरात काम करताना बेशुद्ध पडली. नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयाने तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मेंदूमृत (ब्रेन डेड) झाली. रिद्धी विनायक रुग्णालयाचे समन्वयक सागर वाघ आणि अवयवदान चळवळीचे पुरुषोत्तम पवार यांनी महिलेच्या कुटुंबियांना अवयवदानाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमाप्रमाणे अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा : वसई : रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री आणि वाहतुकीस अडथळा, विशेष मोहिमेत ५० जणांविरोधात कारवाई
६ जणांना मिळाली नवसंजीवनी
या महिलेची एक किडनी केईएम रुग्णालयात तर दुसरी किडनी अपोलो रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपित झाली. लिव्हर ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आले. ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरने त्वचा स्वीकारली तर डोळ्यांचे दोन कॉर्निया सहियारा आय बँकेत सुपूर्द करण्यात आले. ही प्रक्रिया दोन दिवस सुरू होती. या महिलेच्या अवयवदानामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले.
हेही वाचा : वसई : अनधिकृत इमारतींवरील कारवाई थंडावली, राडारोडा आणि मातीच्या ढिगार्यामुळे अडथळा
पालघर जिल्ह्यातील पहिले अवयव प्रत्यारोपण
पालघर जिल्ह्यातील एकाही रुग्णालयाला अवयव प्रत्यारोपणाची मंजूरी नव्हती. त्यामुळे कुणाला अवयवदान करायचे असेल तर मुंबईतील रुग्णालयात करावे लागत होते. नालासोपारा येथील रिध्दीविनायक रुग्णालयाला नुकतीच शासनाकडून अवयवदान प्रत्यारोपणाची मंजुरी मिळाली. त्यानंतर रुग्णालयात झालेले हे पहिले अवयव प्रत्यारोपण आहे. या संपूर्ण अवयवदान प्रक्रियेत रिद्धीविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर व्यंकट गोयल, डॉ प्रणय ओझा, डॉ निमेश जैन, समन्वयक सागर वाघ आदींनी मोलाची भूमिका बजावली.