वसई : पालघर जिल्ह्यात मद्य पिण्याचे प्रमाण वाढले आहे. अकरा महिन्यात देशी विदेशी, बिअर व वाईन अशी सुमारे ३ कोटी १७ लीटर मद्य मद्यप्रेमींनी मनसोक्त रिचवली आहेत. यात सर्वाधिक २ कोटी लीटर बिअर रिचवली आहे. या मद्याविक्रीतून अकराशे कोटींचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्ह्यात देशी दारू विक्रीचे ९७ आस्थापने, विदेशी मद्य विक्रीची (वाईन शॉप) ३५ दुकाने तर ५२१ बिअर विक्रीची दुकाने आहेत. याशिवाय ३९८ परमिट रुम (बार ॲण्ड रेस्टॉरंट) आहेत. तेथून मद्यविक्री होत असते. या मद्यविक्रीची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असते. देशी मद्य, विदेशी मद्य (व्हिस्की, व्होडका, रम) बिअर आणि वाईन असे मद्याचे प्रकार आहे.

मागील काही वर्षांपासून पालघर वसई विरार मध्ये मद्य पिण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. यंदाच्या वर्षात पालघर जिल्ह्यात ४९ लाख ६६ हजार ८५२ लीटर देशी मद्याची विक्री झाली आहे. तर ६४ लाख ५४ हजार१७ लीटर, ३ लाख ८४ हजार ६३० लीटर वाईन आणि १ कोटी ९८ लाख ९६ हजार ४७७ लीटर इतक्या बिअरची विक्री झाली आहे. या अकरा महिन्यात पालघरकरांनी जवळपास अकराशे बारा कोटीं रुपयांचे मद्य खरेदी करून ते मनसोक्त रिचवले आहे.

हेही वाचा : उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, भोंदू मांत्रिकाला अटक

आता वाढती रिसॉर्ट संख्या, पार्ट्यांचे आयोजन यासह विविध कार्यक्रम यामुळे ही मद्यपान होण्याचे प्रमाण वाढीस लागत आहे. मद्य पिण्याचे प्रमाण वाढल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत अकराशे कोटींचा महसूल मिळाला आहे असे पालघर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुधाकर कदम यांनी सांगितले आहे. जे बेकायदेशीर मार्गाने मद्य विक्री व वाहतूक करीत आहेत त्याच्यावर कारवाया केल्या जात आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.

कारवाईत ६ कोटींचे मद्य जप्त

बेकायदेशीर मार्गाने मद्याची विक्री व वाहतूक यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते. मागील अकरा महिन्यात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी १ हजार १०० इतक्या कारवाया करून गुन्हे दाखल केले आहेत. यात ५९ लाख ९३ हजार ७६ लीटर असे ६ कोटी ९ लाख ८६ हजार ९२७ रुपयांचे मद्य जप्त केले आहेत. यात ९२१ आरोपींना ही अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

बेकायदेशीर मद्याचा आकडेवारी नाही

अधिकृत परवानाधाकर मद्यदुकानांतून मद्य विक्रीची आकडेवारी उपलब्ध असली तर बाहेरील राज्यातून चोरट्या मद्यविक्रीची नोंद होत नसते. दिवदमण, सिल्वासा आदी भागातून उत्पादनशुल्क चुकवून मद्य आणले जाते आणि त्याची बेकायदेशीररित्या विक्री होते असते. त्यामुळे मद्य पिणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा : शिधापत्रिकांची कामे रखडली, ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ आठ दिवसांपासून बंद; कामकाज ठप्प

मद्य विक्री आकडेवारी (लीटर )

देशी मद्य – ४९६६८५२

विदेशी मद्य – ६४५४०१७

बिअर – १९८९६४७७

वाईट – ३८४६३०

महसूल १११२.३६ कोटी रुपये

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar district liquor of 1100 crores rupees sold in last eleven months css