विरार : विरारमध्ये काल गुरुवारी अचानक प्रवासी आणि रिक्षाचालकांत रिक्षा भाडय़ावरून वाद सुरू झाला. प्रहार संघटनेने रिक्षा प्रवासी भाडय़ाचे दर असलेले पत्रक रेल्वे स्थानक परिसरात वाटण्यास सुरुवात केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. रिक्षाचालकांनी तीन तास रिक्षा बंद ठेवल्या होत्या.
वसई विरारमध्ये करोनाकाळापासून रिक्षाचालकांनी भाडे वाढ केली आहे. करोनाकाळात रिक्षाचालकांनी दुपटीने भाडे वाढविल्याने प्रवासी संघटनांनी अनेक वेळा विरोध केला होता. पण रिक्षाचालकांनी भाडेवाढ कायम ठेवत प्रवाशांची लूट चालवली होती. त्यातच वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा संघटनांच्या मागणीवरून परिवहन महामंडळाकडून रिक्षाचे दरपत्रक अंतिम ठरवून घेतले आणि त्यानुसार रिक्षाभाडे आकारण्याचे आदेश दिले. मात्र रिक्षाचालकांनी त्याकडेही लक्ष दिले नाही. बेकायदा भाडेवाढ सुरूच ठेवली. पुन्हा प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आणि भाडेवाढ कमी करण्याची मागणी करू लागल्या.
प्रवासी आणि रिक्षाचालक यांतील संघर्ष वाढत गेला. यावर तोडगा काढण्यासाठी प्रवासी संघटना, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यात बैठका होऊन किमान भाडे १५ रुपये आणि केवळ ३ प्रवासी असा ठराव करण्यात आला. यानंतर काही भागात १५ रुपये किमान भाडे आकारले जाऊ लागले. मात्र विरार पूर्वेकडील रिक्षाचालकांनी या बैठकीतल्या तोडग्यासही दाद दिली नाही. यामुळे प्रहार संघटनेने जून २०२१ च्या दरवाढीनुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अंतिम केलेल्या दराचे पत्रक काढून ते विरार रेल्वे स्थानकात वाटायला सुरुवात केली. या पत्रकात किमान प्रतिप्रवासी ९ रुपये भाडे म्हटले आहे. यामुळे प्रवाशांनी रिक्षाचालकांना या पत्रकानुसार दर आकारण्यास सक्ती केली. पण रिक्षाचालकांनी त्यास नकार दिल्याने प्रवासी आणि रिक्षाचालकांत वाद होऊ लागले. वाद वाढत गेल्याने रिक्षाचालकांनी रिक्षा बंद केल्या. तब्बल तीन तास रिक्षा बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. रिक्षा बंद झाल्याने महापालिकेने बस सुरू केल्या. यामुळे घाबरून जात, रिक्षाचालकांनी पुन्हा रिक्षा सुरू केल्याचे काही प्रत्यक्षदर्शीकडून कळले.
दर आकारणी कशाच्या आधारे?
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जून २०२१ नुसार रिक्षा संघटनांच्या मागणीनुसार ३३ टक्के भाडेवाढ करत मीटर रििडगनुसार दर ठरवले आहेत. प्रवासाच्या एकूण किलोमीटरच्या शेअिरगनुसार दर विभागणी दिलेली आहे. ३३ टक्के भाडेवाढीनुसार किमान १ किमीचे भाडे २७.९३ रुपये इतके नक्की केले आहे. सर्वाधिक ६.५ किमीसाठी ३३ टक्के भाडेवाढीनुसार १३४.३३ रुपये प्रति प्रवाशी भाडे अंतिम केले आहे. वसई विरारमध्ये किमान ३ प्रवाशांना प्रवासाची परवानगी असल्याने हे भाडे तीन प्रवाशांत विभागले असता किमान भाडे केवळ ९ तर सर्वाधिक भाडे ४५ होत आहे. यामुळे रिक्षाचालक आकारत असलेले दर हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तीनपट असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही काळात इंधनाचे वाढते दर पाहता ही भाडेवाढ अत्यंत कमी आहे. ती आम्हाला मान्य नाही. हे दर २०१६ मधले आहेत. हे दर लागू केल्यास रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येईल.
— प्रेमकुमार गुप्ता, अध्यक्ष रिक्षा संघटना
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२१च्या मागणीनुसार ३३ टक्के भाडेवाढ करून दर नक्की केले आहेत. यामुळे रिक्षाचालकांनी हेच दर आकारणे अपेक्षित आहेत. हे दर न आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.
– दशरथ वागुळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दरानुसार भाडे आकारावे, अन्यथा आमचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. — हितेश जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना