वसई: चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संतप्त झालेले नागरिकांनी मंगळवारी कामण येथे रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास दोन तास या आंदोलनकर्त्यांनी हा राज्य मार्गाचा रस्ता रोखून धरला होता. चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे अपघात ही घडतात. तर दुसरीकडे धुळीचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
मात्र तरीही या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यासाठी कामण परिसरातील नागरिकांनी एकत्र येत मंगळवारी कामण नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वाहतूक संघटना ही सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा… अखेर वसई-भाईंदर रो-रो सेवेस सुरुवात, प्रायोगिक तत्त्वावर सेवा; प्रवाशांना मोठा दिलासा
मागील अनेक वर्षपासून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी संघर्ष करीत आहेत. परंतु प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला. या आंदोलनात शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याने भिवंडी हुन वसईकडे येणारी व वसईतून भिवंडी कडे जाणारी वाहतूक जवळपास दोन तास आंदोलन कर्त्यांनी रोखून धरली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाहीत तो पर्यँत टोल वसुली बंद करण्यात येईल याशिवाय या रस्त्याच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव झाला आहे त्याला मंजुरी मिळताच काम सुरू होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यंदाच्या पावसाळ्याच्या आधी संपूर्ण रस्ता दुरूस्त झाला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करून पूर्ण कोंडी करू असा इशारा ही यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.