लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. याकडे अजूनही महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी खड्ड्यांच्या छायाचित्र प्रदर्शनातून निषेध व्यक्त केला आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई , ठाणे, पालघर, वसई विरार व सुरत या भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय गेला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहने प्रवास करतात.

मात्र या महामार्गावर पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याचे मार्ग बंद झाल्याने ते सर्व पाणी थेट रस्त्यावर साचू लागले आहे. विविध ठिकाणी पाणी साचून खड्डयांचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ लागली आहे. वर्सोवा पूल,  ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी या दरम्यान खड्डे अधिक असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

आणखी वाचा-वसई: डिश अँटेना सरळ करताना तोल गेला, गच्चीवरून पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा खड्डे भरत नसल्याने शुक्रवारी भूमिपुत्र फाऊंडेशन व स्थानिक नागरिक यांनी खड्ड्यांचे प्रदर्शन भरवत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी स्थानिक नागरिक, पोलीस अधिकारी, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, वाहतूक पोलीस उपस्थित होते.

उपस्थित नागरिकांनी या प्रदर्शनातून खड्डे व महामार्गावर निर्माण होणाऱ्या समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांच्या समोर मांडला. रस्त्यावरील खड्डे येत्या आठ ते दहा दिवसांत बुजविले जातील असे आश्वासन महामार्ग सहायक व्यवस्थापक सुमित ठाकूर यांनी दिले आहे. आश्वासन नंतरही तातडीने उपाययोजना न झाल्यास सर्व ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरून महामार्ग रोखू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत पाटील यांनी दिला आहे.

आणखी वाचा-पुण्यात कोयता गँग तर वसईत तलवार गॅंग; भर रस्त्यात तलवारीने तरुणाचा दहशत माजविण्याचा प्रयत्न

महामार्गावर जे खड्डे पडले आहेत ते बुजविण्याचे काम मास्टिकच्या साहाय्याने केले जाणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत हे सर्व खड्डे बुजविण्याचा प्रयत्न आहे. -सुमित ठाकूर, महामार्ग प्राधिकरण सहायक व्यवस्थापक

पोलिसांनी मांडल्या समस्या

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी अशा समस्या निर्माण होत असतात. अशा वेळी पोलिसांना सुद्धा चांगलीच कसरत करावी लागत आहे. याबाबत वारंवार महामार्ग प्राधिकरणाला आम्ही सूचित केले आहे. तरी सुद्धा कोणत्याच उपाययोजना न झाल्याने येथील परिस्थिती अजूनही तशीच आहे असे नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले. महामार्ग प्राधिकरणाने नागरिकांच्या समस्या जाणून तातडीने समस्या सोडवाव्यात असेही भामे यांनी सांगितले आहे.

Story img Loader