वसई– शहरातील खेळाच्या मैदाने यापुढे फक्त खेळण्यासाठी राखीव ठेवण्याचा तसेच अन्य कुठल्याही खासगी कार्यक्रमांना न देण्याचा निर्णय वसई विरार महापालिकेने घेतला आहे. सोमवारी वसंत नगरी येथील मैदानातील खासगी मेळाव्यात वीजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना आणि खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
वसई पूर्वेकडील वसंत नगरी या निवासी संकुलात पालिकेचे एकमेव खेळाचे मैदान आहे. या मैदानात पालिका विविध कार्यक्रमांना परवानगी देत असते. त्यामुळे खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होत नाही. मुंबईतील आयोजकाला पालिकेने अवध्या १७ हजार रुपयांच्या भाडेपोटी मैदान भाड्यावर दिले होते. तेथे ७ ते २३ मार्च या कालावधीत होली का महोत्सव नावाने मेळाव्याचे आयोजन केले होते. तेथील सदोष वीजजोडणीमुळे एका जाळीला स्पर्श झाल्याने हर्ष सेन (२१) या तरुणाचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेनंतर महापालिकेने खेळाची मैदाने फक्त खेळण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात बुधवारी प्रशासकीय ठरावाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यात शहरातील खेळाच्या सर्व १७ मैदानांवर फक्त खेळ, क्रिडा स्पर्धा यासाठी आरक्षित असतील, त्यात कुठल्याही प्रकारच्या राजकीय, धार्मिक आणि खासगी कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.
आम्ही मसुदा तयार केला असून गुरूवारी आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर तो अंतिम केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर यांनी दिली. या निर्णयामुळे नागरिकांनी आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वसंत नगरी मैदानासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणार्या वसंत नगरी फेडरेशनने या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे.
शहरात पालिकेची १७ मैदाने
वसई विरार महापालिकेची ९ प्रभागाअंतर्गत एकूण १७ खेळाची मैदाने आहेत. त्यात विरार मध्ये विराट नगर मैदान, गोकुळ टाऊनशीप मैदान, पुरापाडा, म्हाडा स्पोर्टस कॉम्प्लेक्स मैदान, मनवेल पाडा, जीवदानी देवी अशा ६ मैदानाचा समावेश आहे. नालासोपारा मध्ये वसंत नगरी, नालासोपारा पोलीस ठाण्याच्या मागील दोन मैदाने, शूर्पारक मैदान, झालावाड गार्डन मैदान, रायन इंटरनॅशनल शाळेजवळी मैदान अशा एकूण ६ मैदानांचा समावेश आहे. वसईत अप्पा मैदान, साईनगर मैदान, विशाल नगर मैदान, चुळणे मैदान आणि नरवीर चिमाजी अप्पा मैदान अशा ५ मैदानांचा समावेश आहे.