लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या बदल्यांच्या प्रकरण चांगलेच तापू लागले आहे. या बदल्यांचे आदेश रद्द करण्यासाठी ३६ पोलिसांनी मॅट मध्ये धाव घेतली होती. मात्र आयुक्तालयात नवीन आलेल्या ७ पोलिसांनी या याचिकेला विरोध करत मॅट मध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बदल्यांचे आदेश रद्द करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे नवीन आलेले पोलीस आणि जुने पोलीस अधिकारी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. या प्रकरणावरी सुनावणी आता १४ जानेवारी रोजी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने बदल्यांबाबत पोलीस महासंचालकांना निर्देश दिले होते. त्यानुसार एकाच आयुक्तालयात दोन जिल्हे असतील आणि त्यातील ज्या पोलीस अधिकार्यांना ३ वर्षे पूर्ण झाली असतील अशा पोलिसांची बदली करण्यात यावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या मुंबई पोलीस आयुक्लयाच्या हद्दीत बदल्या करण्यात आल्या होत्या.
आणखी वाचा-मिरा भाईंदर पालिका आयुक्तांचे बनावट व्हॉट्सअप; अधिकाऱ्यांकडेच पैशांची मागणी
या बदल्यांमुळे पोलिसांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली. बदल्याचे आदेश रद्द करून आम्हाला मूळ ठिकाणी पुन्हा पाठवावे अशी मागणी या ३६ पोलीस अधिकार्यांनी केली आहे. मुळात या बदल्या तात्पुरत्या होत्या. आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे आदेश रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वार करण्यात आली आहे. त्यावर निकाल अपेक्षित असताना आता नवीन आलेल्या पोलिसांनी या बदल्यांना विरोध केला आहे. आयुक्तालयात आलेल्या ७ नवीन पोलीस अधिकार्यांनी या याचिकेत आपली भूमिका मांडण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या आणि बदल्यांचे आदेश रद्द करू नये अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
जुन्या पोलिसांचा दावा काय?
आम्हाला पोलीस ठाण्यात २ वर्षे झालेली नाही, जिल्ह्यात ३ वर्ष आयुक्तालयात ६ वर्षे झालेली नाहीत. तरी देखील निवडणुकीचे कारण देत आमची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यावर झालेल्या अन्यायायविरोधात आम्ही मॅट मध्ये गेलो आहोत. नवीन पोलिसांना आमचा विरोध नाही, असे याचिकाकर्त्या पोलीस अधिकार्यांनी सांगितले. आमच्या बदलीचा आदेश रद्द करावा आणि आम्हाला मूळ ठिकाणी परत पाठवावे अशी या पोलिसांची मागणी आहे. मुंबईतून जे पोलीस या ठिकाणी बदलीने आले आहेत ते कनिष्ठ असून ते याच पोलीस ठाण्यात राहतील, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच नाही, असेही एका अधिकार्याने सांगितले.
आणखी वाचा-अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई सुरू
पहिल्यांदाच १८ पोलीस ठाण्यात प्रभारी
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात एकूण १९ पोलीस ठाणी आहेत. त्यापैकी १८ पोलीस ठाण्यात मुंबईतील दुय्यम पोलीस अधिकारी (सेकंड पीआय) यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्त करण्यात आली आहे. त्यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभारी अधिकारी पोलीस आयुक्तालयात असण्याची ही पहिलीच वेळ आहे.