वसई :  व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण कमी करण्यासाठी तुळींज पोलिसांनी सुरू केलेल्या नशामुक्ती शाळेत एका वर्षांत ४ हजार तरुणांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातील १४ जणांना पुनर्वसन केंद्रात दाखल केले आहे. शाळेमुळे गुन्हेगारीलादेखील आळा बसला आहे. 

शहरातील विविध गुन्ह्यांचा अभ्यास करताना  बहुतांश आरोपी हे अमली पदार्थाचे सेवन करत असलेले आढळून आले आहेत.  या गुन्हेगारीचे मूळ असलेल्या अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करणे तसेच या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांचे समुपेदशन करण्याचा निर्णय नालासोपारामधील तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घेतला होता.  त्यानुसार  दररोज संध्याकाळी नशामुक्ती शाळा सुरू करण्यात आली. पुनरुज्जीवन या सामाजिक संस्थेमार्फत ही शाळा चालविण्यात येते. पोलीस अधिकारीदेखील या तरुणांना मार्गदर्शन करतात. वर्षभरात चार हजार तरुणांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातील १४ मुलांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. बहुतांश तरुणांचा खर्च पोलिसांनी उचलला आहे.  समुपदेशामुळे  अनेक मुले चांगल्या मार्गाला लागल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांनी सांगितले. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात एकूण १७ पोलीस ठाणी आहेत. मात्र केवळ तुळींज पोलीस ठाण्यातच ही अनोखी संकल्पना असलेली नशामुक्ती शाळा सुरू आहे.

हेही वाचा >>> “…या कारभाराला एकनाथ शिंदेच जबाबदार” मुंबई महापालिकेच्या कॅग चौकशीवरून अरविंद सावंतांचं थेट विधान

अमली पदार्थाविरोधात सर्वाधिक कारवाई

एकीकडे नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना योग्य मार्गावर आणण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे अमली पदार्थाविरोधात जोरदार कारवाई सुरू कऱण्यात आली आहे. २०१५ ते २०२० या पाच वर्षांत तुळींज पोलीस ठाण्यात अमली पदार्थाविरोधात केवळ ९५ गुन्हे दाखल होते. मात्र चालू वर्षांतील १० महिन्यांतच १८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हेगार पकडण्याबरोबर गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांनी सांगितले. 

गुन्हेगारीला आळा

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमली पदार्थाविरोधात कारवाई केल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विविध गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय गंभीर गुन्ह्यांनाही आळा बसला आहे. मागील वर्षी तुळींज पोलीस ठाण्यात १७ हत्या घडल्या होत्या. या वर्षी केवळ एका हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader