वसई: नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री विशेष पार्ट्यांचे आयोजन केले जात असते. याच पार्श्वभूमीवर मीराभाईंदर, वसई विरार आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रिय होऊन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी गर्दीची ठिकाणे, चर्च येथील प्रार्थनालये, पर्यटनस्थळी या भागात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून जे  कोणी नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>राज्यातील बस आगारांना ‘कलर कोड’

नवीन वर्षाचे  मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी  अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्या आयोजित केल्या जातात.त्यामुळे मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे, बेधुंद होऊन वाहने चालविणे, मारामारी करणे , छेडछाडी असे अनेक प्रकार घडतात यांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा >>>राज्यात महापालिका स्तरावर प्रादेशिक परिवहन कार्यालय; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

तसेच शहरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात सुरू आहे तर दुसरीकडे विविध महोत्सवही सुरू आहेत त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.या गर्दीचा फायदा घेऊन  गैरप्रकार, वाहतून कोंडी अशा समस्या उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नाकाबंदी याशिवाय पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त घातली जाणार आहे.

विविध ठिकाणी नाकाबंदी

मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. शहरात बाभोळा, भुईगाव, पंचवटी, रेंज नाका, चिंचोटी, बापाणे, तुळींज पुलाखाली, साईनाथनगर, आगाशी यासह अन्य भागात नाकाबंदी केली जाणार आहे.मद्यपी चालकांची तपासणीसाठी ब्रिथ अनालायझर यंत्र ही सज्ज ठेवली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police make tight security arrangements to welcome december 31st and new year amy