नालासोपारा पोलीस एकाकडे अमली पदार्थाविरोधी कारवाई करत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात पोलीसच अमली पदार्थांना संरक्षण देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुळींज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने अमली पदार्थ विक्रेत्याकडून दरमहा ५० हजारांची लाच मागितली होती. ती लाच स्विकारताना लाचलुतचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विठ्ठल सागळे (३४) पोलीस शिपाई हा तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार हा एमडी (मॅफेड्रॉन) नावाचा अमली पदार्थ विक्री करतो. त्याला तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्था विक्री करायची होती. त्याला पोलीस शिपाई विठ्ठल सगळे याने संपर्क केला. जर माझ्या हद्दीत अमली पदार्थ विक्रीचा हा धंदा सुरू ठेवायचा असेल तर महिन्याला ५० हजार रुपये द्यावे लागतील असे पोलीस शिपाई विठ्ठल सगळे याने तक्रारदाराला सांगितले होते. पैसे न दिल्यास कारवाई करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. त्याबाबत त्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत विठ्ठल सगळे याने ५० हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर शुक्रवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला होता. लाचेची ५० हजारांची रक्कम पान टपरी विक्रेता आदर्श गुप्ता याच्या मार्फत स्विकारताना सगळे आणि गुप्ता याला अटक करण्यात आली.

ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे, पोलीस हवालदार योगेंद्र परदेशी, महिला पोलीस हवालदार शमीम शेख, बर्गे आदींच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई विठ्ठल सगळे याच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडूनच अमली पदार्थ विक्रीला संरक्षण

वसई विरार शहारत अमली पदार्थांचा विळखा वाढत आहे. अशावेळी पोलिसांकडून अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई अपेक्षित असते. मात्र विठ्ठल सगळे हा पोलीस शिपाई कारवाई करण्याऐवजी अमली पदार्थ विक्रेत्याकडून हप्ता वसुली करून संऱक्षण देत असल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पोलीस दलाचीही प्रतिमा मलीन झाली असून पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संशय निर्माण झाला आहे.