वसई – वसईच्या तुंगारेश्वर परिसरात दुथडी भरून वाहणार्‍या नदीच्या प्रवाहात बसलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला तेथे बंदोबस्तावर असेलल्या पोलिसाने वाचवले. मात्र चिमुकलीच्या कुटुंबियांनी उर्मटपणा करत संबंधित पोलिसालाच दमदाटी करत मारहाण केली. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी मुलीच्या पित्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र उपाध्याय असे या आरोपीचे नाव आहे.

धबधबे, समुद्रकिनारी होणार्‍या दुर्घटनांमध्ये वाढ होत असली तरी लोक त्यापासून बोध घ्यायला तयार नाही. अशा लोकांना अडवलं तर उलट समोरच्यालाच दमदाटी करत असतात. वसई पूर्वेला तुंगारेश्वर डोंगरावर कोसळणारा धबधबा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. तेथे असलेल्या महादेवाच्या मंदिरातही भाविक दर्शनासाठी येत असतात. येथील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. येथे होणार्‍या दुर्घटना रोखण्यासाठी पोलिसांनी या परिसरात फिरण्यासाठी मनाई आदेश लागू केला आहे. तसे फलक लावले असून जागोजागी बंदोबस्तही ठेवला आहे. मंगळवारी तुंगारेश्वर येथे वाहत्या नदीच्या एका दगडावर दोन वर्षांची मुलगी बसलेली पोलीस शिपाई गणेश शेळके यांना दिसली. पाण्याच्या प्रवाहामुळे ती वाहून जाण्याची शक्यता होती. त्यांनी त्या मुलीला सुरक्षित बाहेर काढले आणि ही मुलगी कोणाची आहे असं विचारणा केली. त्यावेळी मुलीचे वडील जितेंद्र उपाध्याय आणि इतर नातेवाईक आले. आम्हाला अडविणारे तुम्ही कोण? आम्ही वाटेल ते करू असं सांगत त्यांनी पोलीस शिपाई यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. याच वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख हेदेखील बंदोबस्ताच्या पाहणीसाठी तेथे आले होते. त्यांच्याशीदेखील उपाध्याय कुटुंबियांनी वाद घातला. अखेर पेल्हार पोलिसांनी जितेंद्र उपाध्याय (३०) याला सरकारी कामात अडथळा आणणे, कर्तव्यावर तैनात पोलिसांना धक्काबुक्की करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, धमकी देणे आदीसाठी कलम ३५३, ३५४, ५०४ आणि ५०६ अंतर्गत अटक केली आहे.

हेही वाचा – “संभाजी भिडे नावाचा वेडा माणूस…”, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड प्रचंड आक्रमक

हेही वाचा – Monsoon Session: “माझा सख्खा भाऊ असला, तरी…”, संभाजी भिडे प्रकरणावर फडणवीस संतापले; ‘गुरुजी’ उल्लेखावरून वाद!

पावसाळ्यात ही पर्यटनस्थळे धोकादायक बनतात. तेथे दुर्घटना घडू नये यासाठी मनाई आदेश काढण्यात आला आहे. तेथे जाणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मात्र जितेंद्र उपाध्याय या आरोपीने पोलीस शिपायाला दमदाटी करून धक्काबुक्की केली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली. भाविकांनी केवळ मंदिरात जावे. धबधबे, नदीत जाऊ नये असे आवाहन पेल्हार पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Story img Loader