भाईंदर : मिरा रोड मध्ये विक्रीसाठी आलेले जवळपास दीड हजार किलो गोमांस पकडण्यात काशिगाव पोलिसांसह गोरक्षकांना यश आले आहे.यात मांसाचे नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.
मिरा रोड येथील निळकमल नाक्यावर गोमांस येत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती.म्हणून काही कार्यकर्ते या वाहनाची प्रतीक्षाच करत होते. दरम्यान शनिवारी रात्री १ च्या सुमारास एक टेम्पो त्या ठिकाणी आल्यावर कार्यकर्त्यांनी त्याला रोखले.मात्र इतक्यात वाहन चालकाने वाहन सोडूनच तेथून पळ काढला.त्यानंतर वाहनाची पाहणी केल्यानंतर त्यात गोमांसचे तुकडे आढळून आले.त्यामुळे गोरक्षकांनी याबाबत तातडीने काशिगाव पोलिसांना माहिती देऊन घटना स्थळी बोलावून घेतले.
हेही वाचा…वसईत मांसाहार बंदीच्या निर्णयाच्या फज्जा, बंदी झुगारून चिकन-मटण विक्रीची दुकाने सुरू
त्यानुसार पोलिसांनी वाहनाची माहिती घेतली असता त्यावर बनावट नंबर पाटी लावण्यात आली आल्याचे दिसून आले आहे.शिवाय कोणाला शंका येऊ नये म्हणून हे गोमांस गोण्याच्या खाली बर्फात ठेवण्यात आले होते.प्रामुख्याने अंदाजे हे दीड हजार किलो गोमांस असून यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत ( फॉरेन्सिक विभागाला ) पाठवण्यात आले आहेत. तसेच पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेत असून तपास सुरु असल्याची माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय साठे यांनी दिली आहे.